स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आली गोविंदपूर गावात बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:14 AM2017-12-22T01:14:48+5:302017-12-22T01:15:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : तालुक्यातील गोविंदपूर हे साधारण ७०० लोकवस्तीचे गाव आहे. येथील नागरिकांना आरोग्य सेवा, प्रशासकीय काम तथा शिक्षणासाठी दररोज तरोडा, हिंगणघाट, वर्धा येथे जावे लागते; पण ये-जा करण्यासाठी परिवहन महामंडळाची बसफेरी नसल्याने पायपीट करावी लागत होती. वारंवार मागणी केल्यानंतर परिवहन महामंडळाने बसफेरी सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बुधवारी गावात बस पोहोचल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
बसफेरी सुरू करण्याकरिता बस येथील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. लोकप्रतिनिधींना निवेदने दिली; पण लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित धोरणामुळे येथे बस सुविधा सुरू होऊ शकली नाही. स्वातंत्र्याची ७० वर्षे लोटली तरी गोविंदपूर येथील ग्रामस्थांना लालपरीचे दर्शन झाले नव्हते. अखेर ती प्रतीक्षा बुधवारी संपुष्टात आली. हिंगणघाट ते बेला, वाघोली मार्गे बसफेरी सुरू करण्यात आली. या बसने शहर गाठणे आता सोयीचे होणार आहे. ही बस हिंगणघाट येथून बेला, वाघोली, गोेविंदपूर, नुरापूर, सास्ताबाद, सावली, तरोडा मार्गे वर्धेला येणार आहे. ग्रामस्थांनी बसला हार वाहून नारळ फोडले. चालक व वाहक टिपले यांचा सत्कार केला. बसफेरीसाठी नुरापूर येथील सामाजिक कार्यकर्ते कवडू गजभिये यांनी आटोकाट प्रयत्न केले. ग्रामस्थांनी त्यांचाही गौरव केला. यावेळी राहुल चौधरी, मनोहर राऊत, राहुल दालवणकर, बालू खोब्रागडे, अमोल रंगारी, दुर्योधन, रूपचंद खोब्र्रागडे, सुनील धोबे, प्रवीण देवडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.