कारंजात आजी-माजी आमदारांचा कस
By admin | Published: October 28, 2015 02:22 AM2015-10-28T02:22:56+5:302015-10-28T02:22:56+5:30
कारंजा नगर पंचायतीची निवडणूक आता काहीच दिवसांवर येवून ठेपली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपाकडून जोरदार प्रचार युद्ध सुरू आहे.
नगर पंचायत निवडणूक : शिवसेना व अपक्षांमुळे नव्या समीकरणाचे संकेत
अरुण फाळके कारंजा (घाडगे)
कारंजा नगर पंचायतीची निवडणूक आता काहीच दिवसांवर येवून ठेपली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपाकडून जोरदार प्रचार युद्ध सुरू आहे. खर्डीपूरा पॅनल समर्थित भाजप परत सत्ता मिळविण्यासाठी तर बाजार पार्टी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सत्ता कायम राखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे.
आ. अमर काळे यांनी प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतली असून ते येथे तळ ठोकून आहे. पक्षांंतर्गत नाराजी आणि उमेदवारी न मिळाल्याने हिरमोड झालेल्या कार्यकर्त्यांची मनधरणी त्यांच्याकडून सुरु आहे. तसेच ते ‘डोअर टु डोअर’ प्रचारावर अधिक भर देत असून ते विकासाचा अजेंडा मतदारांना पटवून देताना दिसून येत आहे. भाजपानेही प्रचारात आघाडी घेतली आहे. माजी आमदार दादाराव केचे यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा आहे. स्थानिक नेते, गटबाजी आणि रूसवे फुगवे विसरून कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचाही सूर आहे. तर काहींनी पक्षादेश झुगारुन बंडखोरीचा झेंडा हातात घेतला आहे.
कारंजा ४ हजार ९३० पुरूष व ४ हजार ७१४ अशा एकूण ९ हजार ६४४ मतदारांवर उमेदवारांची भिस्त आहे. संपूर्ण शहरांचे विभाजन १७ प्रभागात झाले आहे. प्रत्येक प्रभागात सुमारे ५०० ते ५५० मतदार आहेत. सर्वाधिक मतदार वॉर्ड ब ७ (६९९ मतदार) व वॉर्ड ८ मध्ये (७०२ मतदार) आहेत. वॉर्ड लहान व मतदार संख्या कमी असल्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना कस लागणार आहे.
माजी सरपंच शिरीष भांगे, माजी सरपंच नितीन दर्यापूरकर, माजी सरपंच अरविंद चरडे, माजी उपसभापती प्रेम महिले, शिवसेना नेते संदीप टिपले, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप पालीवाल या सर्वांना ही निवडणूक वाटते तितकी सोपी नसून यापूर्वी त्यांनी केलेल्या कामाचा हिशेब मतदारांना द्यावा लागणार आहे. गत ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले काही उमेदवार पुन्हा आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. त्यांना फक्त सात महिन्यांचा सत्ता कालावधी उपभोगता आला. त्यांना या कालावधीत काही करता आले नाही. यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांत सहानूभुती दिसून येत आहेत.
भाजपा व काँग्रेसचे १७ उमेदवार तर शिवसेनेने १४ उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त पाच उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. आप आणि माकपानेही उमेदवारी नोंदविली आहे. खरी लढत जरी काँग्रेस आणि भाजपात होणार असली तर शिवसेनेचे काही उमेदवार आणि अपक्ष उमेदवार वरील दोन्ही पक्षाचे राजकीय समीकरण बिघडवून विजयांची अनिश्चितता वाढवित आहे. विजय कुणाचा हे आज तरी सामने कठीण आहे.