पीक कर्जात पाच बँकांची माघारच

By admin | Published: September 16, 2015 02:40 AM2015-09-16T02:40:09+5:302015-09-16T02:40:09+5:30

गत चार वर्षांपासून सुरू असलेली दुष्काळी स्थिती लक्षात घेत यंदा शेतकऱ्यांना पीक कर्जाचा आधार देणे गरजेचे होते.

Five bank withdrawal of crop loan | पीक कर्जात पाच बँकांची माघारच

पीक कर्जात पाच बँकांची माघारच

Next

जिल्ह्याने गाठले ९४ टक्के उद्दिष्ट : सहा बँकांनी ‘क्रॉस’ केले ‘टार्गेट’
प्रशांत हेलोंडे वर्धा
गत चार वर्षांपासून सुरू असलेली दुष्काळी स्थिती लक्षात घेत यंदा शेतकऱ्यांना पीक कर्जाचा आधार देणे गरजेचे होते. यामुळेच शासनाच्या आदेशावरून बँकांनी १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याचे प्रयत्न चालविले आहेत. प्रारंभी रखडलेली पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया मध्यंतरी वेगात पुढे सरकली. यामुळे पीक कर्ज वाटपामध्ये जिल्ह्याला ३१ आॅगस्टपर्यंत ९४ टक्के उद्दीष्ट गाठता आले आहे. यात सहा बँकांनी उद्दिष्टापेक्षाही अधिक कर्ज दिले तर पाच बँकांना ६० टक्केही कर्ज वाटप करता आलेले नाही.
गतवर्षी कोरडा दुष्काळ व त्यापूर्वी अतिवृष्टी यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. २०१३-१४ मध्ये दुष्काळ जाहीर झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाचे व्याज माफ करून कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. परिणामी, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला; पण एक लाखाच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना जटील प्रक्रियांचा सामना करावा लागला. यानंतर बँकांना प्रत्येक शेतकऱ्याला कर्जाचा पुरवठा झालाच पाहिजे, असे निर्देश देण्यात आले. यामुळे जिल्हाधिकारी व अग्रणी बँकेने सर्व बँकांना सूचना देत कर्ज पुरवठ्याचा पाठपुरावा केला.
३१ आॅगस्टपर्यंत जिल्ह्याला ९४ टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठता आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ५६ हजार १०९ शेतकऱ्यांना ५०८ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. खरीप व रबी हंगामातील एकूण कर्जदार शेतकरी ६० हजार ५०९ आहे. उर्वरित सहा टक्के शेतकऱ्यांनाही येत्या काही दिवसांत कर्ज पुरवठा करून १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील बँक आॅफ इंडिया, अलाहाबाद बँक, युको बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, कार्पोरेशन बँक आणि आयसीआयसीआय या सहा बँकांनी कर्ज वाटपाचे १०० टक्के उद्दीष्ट गाठले आहे. शिवाय अतिरिक्त शेतकऱ्यांनाही कर्ज वितरित केले आहे. असे असले तरी सहा बँकांना कर्ज वाटपाचे ६० टक्केही उद्दिष्ट गाठता आलेले नाही. यात स्टेट बँक आॅफ हैदराबाद १२.८४ टक्के, आंध्रा बँक २०.४७ टक्के, अ‍ॅक्सीस बंक ३६.८६ टक्के, सिंडिकेट बँक ३८.५२ टक्के तर बँक आॅफ बडोदाने ५४.५१ टक्के यांचा समावेश आहे. या बँकांच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्याला कर्ज वाटपाचे १०० टक्के उद्दिष्ट गाठताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसते. खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून कर्ज वाटपाला मुदतवाढ देण्यात आली. शिवाय हवामानावर आधारित पीक विमा योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली; पण बँका कर्ज वाटपाबाबत गंभीर नसल्याचेच दिसते. ६० टक्केच्या आत कर्ज वाटप असलेल्या बँकांना प्रशासनाने वठणीवर आणणे गरजेचे झाले आहे.
गतवर्षी दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश शासनाने दिले. यावरून जिल्ह्यातील १० हजार ७६ शेतकऱ्यांच्या १३९ कोटी ९३ लाख रुपये कर्जाचे बँकांकडून पुनर्गठण करण्यात आले. २४ हजार ८९३ खातेदारांना २२७ कोटी २१ लाख रुपयांचे नवीन कर्ज दिले. शिवाय ३१ हजार २१६ शेतकऱ्यांच्या २८१ कोटी २५ लाख रुपयांच्या कर्जाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
सर्वाधिक व सर्वात कमी कर्ज वाटप
जिल्ह्यात सर्वाधिक पीक कर्ज वाटप बँक आॅफ इंडियाने केले आहे. या बँकेने २१ हजार ११४ शेतकऱ्यांना १५१ कोटी ४७ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण केले आहे. यातून बँकेचे १०१.३१ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. शिवाय पुनर्गठण व नूतनीकरणातही बँकेचे ९०.५६ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. सर्वात कमी ५२ शेतकऱ्यांना ४३ लाख ६४ हजार रुपयांचे पीक कर्ज स्टेट बँक आॅफ हैदराबादने वितरित केले आहे.

Web Title: Five bank withdrawal of crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.