पाच दाम्पत्यांच्या काळजाचे तुकडे सुरक्षित परतले युद्धभूमीतून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 05:00 AM2022-03-07T05:00:00+5:302022-03-07T05:00:12+5:30
वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला. त्यामुळे हे पाचही भावी डॉक्टर युक्रेन देशात अडकले. सुखरूप मायदेशी परतण्याची ओढ असलेल्या या पाचही भावी डॉक्टरांनी मोठे धाडस करून युक्रेनची बाॅर्डर पार केली. सेलूची जान्हवी ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच आपल्या मूळगावी परतली असली, तरी युद्ध पेटल्याने तिच्या मित्र-मैत्रिणींचे काय होणार? अशीच चिंता तिला अजूनही सतावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील पाच तरुण-तरुणी युक्रेन देशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. यात दोन तरुण, तर तीन तरुणींचा समावेश असून, रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध पेटल्याने हे पाचही भावी डॉक्टर युक्रेनमध्ये अडकले. त्यामुळे या पाचही भावी डॉक्टरांच्या कुटुंबीयांना त्यांची चिंता लागली असतानाच आता हे पाचही जण सुखरूप आपल्या मायदेशी परतले आहेत. तशी नोंद जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली असल्याचे सांगण्यात आले. वर्धा येथील लविशा अनिल वलिच्छा, हिंगणघाट येथील यश विनोद मोटवाणी, सेलू येथील जान्हवी राहुल त्रिवेदी, पुलगाव येथील प्रणय सुरेश ताजणे, तर समीरण चंद्रशेखर काळे हे वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये होते. त्यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला. त्यामुळे हे पाचही भावी डॉक्टर युक्रेन देशात अडकले. सुखरूप मायदेशी परतण्याची ओढ असलेल्या या पाचही भावी डॉक्टरांनी मोठे धाडस करून युक्रेनची बाॅर्डर पार केली. सेलूची जान्हवी ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच आपल्या मूळगावी परतली असली, तरी युद्ध पेटल्याने तिच्या मित्र-मैत्रिणींचे काय होणार? अशीच चिंता तिला अजूनही सतावत आहे.
मोठा धोका पत्कारून पार केली युक्रेनची बाॅर्डर
वैद्यकीय शिक्षणासाठी मी युक्रेनमध्ये होतो. रशिया आणि युक्रेन या दोन देशांत अचानक युद्ध पेटल्याने युक्रेनमध्ये प्रत्येक क्षणाला परिस्थिती बदलत आहे. धोक्याची माहिती देणारे सायरन वाजला की सुरक्षित ठिकाणी पळा, मिळेल ते खाऊन पोट भरा, अशीच परिस्थिती येथे आहे. अशाही परिस्थितीत स्वत:ला सावरत आम्ही युक्रेनची बॉर्डर पार केली. कुटुंबियांनी दिलेला धीर महत्त्वाचा ठरला.
- यश मोटवाणी, हिंगणघाट.
अचानक पेटलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये परिस्थिती विदारकच आहे. रोमानियाच्या दिशेने प्रवास करीत असताना बॉर्डरपूर्वी अचानक माझी प्रकृती बिघडली. कडाक्याच्या थंडीमुळे माझे पायच गोठले होते. त्यामुळे आपण तुरकीश नामक रेस्टॉरंटमध्ये आश्रय घेतला. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर आपण युक्रेन-रोमानियाची बाॅर्डर पार केली. त्यानंतर माझी सुखरूप घरवापसी झाली आहे.
- समीरण काळे, पुलगाव.
युद्ध सुरू झाल्याने आम्हाला आपल्या मायदेशी परत जाण्याच्या सूचना मिळाल्या. पण येथील परिस्थिती वेळोवेळी बदलत असल्याने मोठा धाडस करूनच मिळेल त्या वाहनाने प्रवास करून युक्रेनची बॉर्डर पार कारावी लागली. युक्रेनची बॉर्डर पार करण्यासाठी सुरू केलेल्या प्रवासादरम्यान आमच्या वाहनावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा होता. तोच आमच्यासाठी सुरक्षा कवच ठरला.
- प्रणय ताजणे, पुलगाव.
ऑपरेशन गंगा
युद्धामुळे युक्रेन देशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारच्या वतीने ऑपरेशन गंगा ही मोहीम राबविली जात आहे. याच विशेष मोहिमेचा वर्धा जिल्ह्यातील चारही भावी डॉक्टरांना वेळीच मायदेशी परतण्यासाठी फायदाच झाला आहे. आपला काळजाचा तुकडा सुखरूप घरी परतल्याने या भावी डॉक्टरांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.