एकाच दिवशी पाच कोविड बाधित आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:00:34+5:30

कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त भागातील वीज वितरण विभागाची दुरुस्तीची कामे करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातून २० कर्मचारी गेले होते. परतल्यानंतर त्यातील तीन कर्मचारी शनिवारी कोरोना बाधित निघाल्यावर उर्वरित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १२ व्यक्तींचे अहवाल रविवारी सकाळी आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे.

Five covid were found infected on the same day | एकाच दिवशी पाच कोविड बाधित आढळले

एकाच दिवशी पाच कोविड बाधित आढळले

Next
ठळक मुद्देसर्व रुग्ण महावितरणचे कर्मचारी : कोकणात गेले होते दुरूस्तीच्या कामाला, जिल्ह्याची रुग्णसंख्या २७

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट/पुलगाव/विजयगोपाल : चक्रीवादळामुळे कोकणात खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करून परत आलेले वीज वितरण विभागाचे आणखी पाच कर्मचारी रविवारी कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहेत. यात तीन कर्मचारी हिंगणघाट तर दोन कर्मचारी देवळी तालुक्यातील आहेत.
कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त भागातील वीज वितरण विभागाची दुरुस्तीची कामे करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातून २० कर्मचारी गेले होते. परतल्यानंतर त्यातील तीन कर्मचारी शनिवारी कोरोना बाधित निघाल्यावर उर्वरित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १२ व्यक्तींचे अहवाल रविवारी सकाळी आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. तर दोन व्यक्तींचे अहवाल कोविड निगेटिव्ह आले. पाच व्यक्तींचे अहवाल इनकनक्लुसिव्ह आहेत. नव्याने आढळलेल्या पाच कोरोना बाधितांना सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे कोविड रुग्णालय आणि सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

हिंगणघाटचे सेवाग्राम तर देवळीचे सावंगीच्या रुग्णालयात
रविवारी महावितरणच्या १२ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह तर दोन व्यक्ती कोरोना निगेटिव्ह तसेच पाच व्यक्तींचे अहवाल इनकनक्लुसिव्ह आहेत. यामध्ये तीन कर्मचारी हिंगणघाट मधील असून एक पुलगाव आणि एक विजयगोपाल येथील आहे. हिंगणघाट मधील बाधित कर्मचाऱ्यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात तर देवळी मधील रुग्णांना सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नवे रुग्ण २९ ते ५५ वयोगटातील
रविवारी नव्याने आढळलेले कोरोना बाधित व्यक्ती हे २९ ते ५५ वयोगटातील आहेत. हिंगणघाट येथील रुग्ण ५५, २९, ३० तर देवळी येथील रुग्ण ५० व ४० वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले.
१४ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
रविवारी एकाच दिवशी पाच कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय पाच नव्या रुग्णानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २७ झाली असून त्यातील १२ कोरोनामुक्त तर १४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर एकाचा पूर्वीच मृत्यू झाला असून संस्थात्मक विलगिकरणात सध्या १४१ व्यक्ती आहेत.

तिघे पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन झाले खडबडून जागे
कोकणातून परलेल्या महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांना सुरूवातीला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले होते. पण २० पैकी तिघांचा अहवाल शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर कोकणातून परतलेल्यांना शोधून काढून त्यांचे स्वॅब घेण्यात आले. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात पाच जण कोरोना बाधित असल्याचे पुढे आले.

राज्यशासनाने वर्धा जिल्ह्यातील महावितरणचे वीस कर्मचारी कोकणात सेवेकरिता बोलाविले. ते तेथून वर्ध्यात परत आल्यानंतर कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जे तालुके ग्रीन झोनमध्ये होते, त्या तालुक्यातही रुग्ण संख्या वाढत आहे. सोबतच सेवाग्रामचे वैद्यकीय अधिकारीही मुंबईमध्ये सेवा देण्यासाठी बोलाविण्यात आले आहे. दोनशे किलो मीटरच्या परिसरातील अधिकारी सेवेकरिता बोलाविणे योग्य आहे. परंतू वर्ध्यातील अधिकारी इतक्या लांब बोलावणे आणि ग्रीन झोनमध्ये धोका निर्माण करण्याची शासनाची ही भूमिका निषेधार्य आहे.
- समीर कुणावार, आमदार, हिंगणघाट.

हिंगणघाट :-
महावितरणचे तीन कर्मचारी सुरूवातीला कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर कोकणातून हिंगणघाटात परतलेल्या इतर कर्मचाºयांचा शोध घेण्यात आला. दोन कर्मचारी सहज मिळाले; पण एक व्यक्ती अल्लीपूर नजीकच्या शिरुड येथे अमलीपदार्थाचे सेवन करताना आढळून आला. हाच व्यक्ती आता कोरोना बाधित असल्याचे पुढे आल्याचे खात्रिदायक सूत्रांनी सांगितले.
हिंगणघाट येथे एकाच दिवशी तीन कोरोना रुग्ण सापडल्याने तुकडोजी वॉर्ड भागातील आदर्शनगर, म्हाडा कॉलनी येथील गार्डन परिसर सील करण्यात आला आहे.
शिवाय हायरिस्क मधील १९ व्यक्तींना शोधून त्यांचे स्वॅब कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.

पुलगाव :-
पुलगाव येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने हरिरामनगरचा काही भाग सील करण्यात आला आहे.
या रुग्णाच्या हायरिस्कमध्ये चार तर लो-रिस्कमध्ये सात व्यक्ती आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या चार व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

विजयगोपाल :-
विजयगोपाल येथे कोरोना बाधित सापडल्याने गावातील विठ्ठलनगर परिसर सील करण्यात आला आहे.
कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या पाच तर लोरिस्क मधील २३ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या पाच व्यक्तीच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.

Web Title: Five covid were found infected on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.