पाच झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी
By admin | Published: September 29, 2014 11:09 PM2014-09-29T23:09:07+5:302014-09-29T23:09:07+5:30
बोरगाव (मेघे) परिसरात असलेल्या गिट्टी खदान लगतच्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीत एकाच रांगेत असलेल्या चार झोपड्यांचा कोळसा झाला तर अन्य एक घर थोडक्यात बचावले.
बोरगाव (मेघे) झोपडपट्टीत आग : घरातील अन्नधान्यासह सर्वच साहित्याची राख
वर्धा : बोरगाव (मेघे) परिसरात असलेल्या गिट्टी खदान लगतच्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीत एकाच रांगेत असलेल्या चार झोपड्यांचा कोळसा झाला तर अन्य एक घर थोडक्यात बचावले. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. केवळ अर्ध्यां तासात या चार झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी येत त्यांचा कोळसा झाला. तर पाचव्या घराची एक भिंत आगीच्या विळख्यात आली.
सकाळी १० वाजताच्या सुमारास या भागातील नागरिक कामाला जाण्याची वेळ असताना अचानक आग लागल्याची वार्ता परिसरात पसरली. नागरिकांनी आग लागल्याच्या ठिकाणाकडे धाव घेतली. यात एका ओळीत असलेल्या चार झोपड्या आगीच्या विळख्यात आल्याचे साऱ्यांच्या निर्शनात आले. पाहता पाहता येथील गंगुबाई, शबनम जावेद अली, किरण राजू रामटेके, अर्चना हनुमंत आमझरे यांच्या घरातील जीवनावश्यक साहित्याचा कोळसा झाला. तर विठ्ठल मसराम यांच्या घराला आगीने विळख्यात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीवर ताबा मिळविण्यात यश आल्याने त्यांच्या घराला विशेष हानी पोहोचली नाही. रस्त्याच्या कडेला असलेली त्यांच्या घराची एक भिंतीचे आगीमुळे नुकसान झाले. यात सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आगीची माहिती परिसरातील नागरिकांनी शहर पोलिसांना दिली. ही आग विझविण्याकरिता परिसरातील नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन बंब येण्यापूर्वी नागरिकांनी जवळच असलेल्या हातपंपावरून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. या झोपड्या केवळ लाकूड, ताटवे व प्लास्टिकपासून तयार असल्याने आग वाढतच होती. यावर ताबा मिळविणे कठीण जात होते. पोलिसांकडून माहिती मिळताच वर्धा नगरपरिषदेचा अग्निशमन बंब निघाला; घटनास्थळी पोहोचण्याकरिता त्याला विलंब झाला. बंब पोहोचेपर्यंत आगीने चार झोपड्या कवेत घेतल्या. यात घरातील सर्वच साहित्याचा कोळसा झाला. जेवणाकरिता वा अंगावार घालण्याकरिता एक कपडाही या घरात शिल्लक राहिला नाही. आग विझविण्याकरिता येथील पालिका व उत्तम गॅल्वा कंपनीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले होते. सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेची नोंद शहर ठाण्यात करण्यात आली आहे. नुकसानग्रस्तांना मदतीची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)