पाच लाखांचे चंदन लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:31 AM2018-08-01T00:31:14+5:302018-08-01T00:33:01+5:30
गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून बेवारस स्थितीत पडून असलेल्या साहित्याची पाहणी केली. यावेळी एका बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड असल्याचे त्यांना दिसले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून बेवारस स्थितीत पडून असलेल्या साहित्याची पाहणी केली. यावेळी एका बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड असल्याचे त्यांना दिसले. हे लाकुड ६० हजारांच्या किंमतीचे असल्याचे बोलले जात असले तरी त्याची किंमत बाजारपेठेत सुमारे पाच लाखांच्या घरात असल्याचा कयास रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्यावतीने वर्तविला जात आहे.
वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गस्तीवर असताना वर्धा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ वर पडून असलेल्या बेवारस साहित्याची पाहणी केली. यावेळी एका बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात लाकुड आढळून आले. हे लाकुड नेमके कुठल्या प्रजातीच्या झाडाचे आहे याची शहानिशा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना देत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले.
पाहणी अंती त्यांनी सदर लाकुड चंदनाचे असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या जनावांना सांगितले. सदर लाकुड रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जप्त केले आहे. सदर प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नागपूर येथील वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनात वर्धा रेल्वे सुरक्षा बलाचे ठाणेदार सुरेश कांबळे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी केली.
गांजा नंतर चंदन तस्करीचे हब?
सेवाग्राम रेल्वे स्थानक गांजा तस्करीचे हब होऊ पाहत असल्याचे वेळोवेळी करण्यात आलेल्या कारवाई समोर आले आहे. तर याच पाश्वभुमिवर आता चंदन तस्करांनी वर्धा रेल्वे स्थानक होत पूढील प्रवास करण्यास सुरूवात केल्याचे या कारवाई वरून दिसून येत आहे.
‘त्या’ अहवालावरून होणार किंमत निश्चिती
जप्त केलेले लाकुड किती आहे याची माहिती पंचनामा करताना नोंदविण्यात आली आहे. सदर माहिती मैसुर येथे पाठविण्यात आली असून तेथून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या चंदनाच्या लाकडाची योग्य किंमत माहित पडणार असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने सांगण्यात आले.