पाच महिन्यांचे पाणी शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:21 PM2018-09-17T23:21:03+5:302018-09-17T23:21:41+5:30
मागील वर्षीच्या तूलनेत यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने जलाशयांच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना आहे. दररोजी येळाकेळी व पवनार येथील धाम नदीतून वर्धा न.प. प्रशासन ३२ एमएलडी पाण्याची उलच करीत असून वर्धेकऱ्यांच्या वाट्याला सध्या केवळ पाच महिन्यांचे पाणी शिल्लक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील वर्षीच्या तूलनेत यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने जलाशयांच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना आहे. दररोजी येळाकेळी व पवनार येथील धाम नदीतून वर्धा न.प. प्रशासन ३२ एमएलडी पाण्याची उलच करीत असून वर्धेकऱ्यांच्या वाट्याला सध्या केवळ पाच महिन्यांचे पाणी शिल्लक आहे. पुढील काळात जोरदार पाऊस न झाल्यास वर्धेकरांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. परिणामी, प्रत्येकाने आता पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.
धाम नदीवरील धाम प्रकल्प वर्धेकरांच्या ऋृष्णातृप्तीसाठी फायद्याचा आहे. या प्रकल्पात साठविलेले पाणी पाटबंधारे विभाग वेळोवेळी सोडत असल्याने व त्याची उचल करून न.प. प्रशासन ते शुद्ध करून त्याचा पुरवठा वर्धेकरांना करीत असल्याने उन्हाळ्या दिवसातही वर्धेकरांना पिण्यायोग्य मुबलक पाणी मिळते. वर्धा न.प. प्रशासन पवनार व येळाकेळी येथील धाम नदीतून दररोज ३२ एमएलडी उचल करते. शिवाय उचल करण्यात आलेले पाणी शुद्ध करून त्यापैकी २७ एमएलडी पाणीचा वर्धा न.प. प्रशासन वर्धेतील सुमारे १५ हजार कुटुंबियांना पुरवठा करते. परंतु, यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने ऐरवी डिसेंबर मध्ये वर्धेकरांवर ओढावणारी परिस्थिती सप्टेंबर महिन्यातच ओढावली आहे. सध्या स्थितीत केवळ पाच महिने पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याचे सांगण्यात येते. इतकेच नव्हे तर सध्या धाम प्रकल्पात केवळ ३८ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे. भविष्यातील जलसंकटावर कशी मात करता येईल यासाठी सध्या न.प. प्रशासन नियोजनबद्ध कार्यक्रम आखत आहे.
धाम मध्ये फक्त ३८ टक्के जलसाठा
उन्हाळ्याच्या दिवसात तसेच अल्प पाऊस झाल्यावर नागरिकांना धाम प्रकल्प फायद्याचा ठरतो. या प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे येळाकेळी व पवनार येथील धाम नदीच्या जलपातळीत वाढ होते. शिवाय धाम नदीपात्रातून उचल करण्यात आलेले पाणी शुद्ध करून त्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. परंतु, सध्या स्थितीत धाम प्रकल्पात केवळ ३८ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
नळाला तीन दिवसाआड पाणी येण्याची शक्यता
भविष्यातील जल संकट लक्षात घेवून सध्या वर्धा न.प. प्रशासन उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करीत आहे. सध्या एक दिवसाआड नळाला पाणी येत असले तरी येत्या काही दिवसात वर्धा न.प. प्रशासन नागरिकांसाठी तीन दिवसाआड पाणी सोडण्याचा विचार करीत आहे. संभाव्य जलसंकट लक्षात घेवून वर्धा न.प. च्यावतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाला जिल्हाधिकाºयांनी हिरवी झेंडी दिल्यावर तीन दिवसाआड नळाला पाणी येणार आहे.
पाटबंधारे विभागाने वेळोवेळी प्रकल्पातून पाणी सोडल्यास योग्य नियोजन करून वर्धेकरांना आम्ही पाच महिने पाणी देऊ शकतो. परंतु, येत्या काही दिवसात जोरदार पाऊस न आल्यास जलसंकटाची समस्या निर्माण होणार आहे.
- निलेश नंदनवार, अभियंता, न.प. पाणी पुरवठा विभाग, वर्धा.