वर्षभरात पाच अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Published: October 1, 2014 11:27 PM2014-10-01T23:27:39+5:302014-10-01T23:27:39+5:30
भ्रष्टाचार, अपसंपत्तीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गत वर्षभरात तब्बल पाच वर्ग एकच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे़ जनतेच्या तक्रारींची तत्परतेने दखल घेत एसीबीने भ्रष्टाचाराविरूद्ध
वर्धा : भ्रष्टाचार, अपसंपत्तीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गत वर्षभरात तब्बल पाच वर्ग एकच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे़ जनतेच्या तक्रारींची तत्परतेने दखल घेत एसीबीने भ्रष्टाचाराविरूद्ध कडक कारवाई करीत लाचेची १७ प्रकरणे दाखल केली़
यवतमाळचे उपजिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी ज्ञानेश्वर भट यास ३० हजारांची लाच घेण्याच्या प्रकरणाचा समावेश आहे़ वर्ग दोनचे दोन, वर्ग तीनचे आठ अधिकारी, खासगी व अन्य प्रकरणांत नऊ मोठी प्रकरणे दाखल केली़ भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने १७ प्रकरणांत भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई केली़ यात १२ प्रकरणे वर्धा जिल्ह्यातील, नागपूर दोन, चंद्रपूर दोन व यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रकरण आहे़ गतवर्षी भ्रष्टाचाराच्या आठ प्रकरणांत कारवाई करून दोषींविरूद्ध गुन्हे दाखल केले होते़ यावर्षी आॅगस्ट अखेरपर्यंत १७ प्रकरणांत यशस्वी सापळा रचून दोषीविरूद्ध कारवाई पूर्ण केली़ अपसंत्ती तसेच भ्रष्टाचार व अन्य प्रकरणांत या विभागातर्फे निनावी तक्रारींची तत्परतेने दखल घेण्यात येत आहे़ तक्रारीत तथ्य आढळल्यास त्वरित कारवाई केली जाते़
वर्षाच्या प्रारंभीच गिरड येथील शेतकऱ्याला अटकेची धमकी देत एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला तर भूमापन विभागातील कर्मचाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वर्धा येथे अटक करण्यात आली होती़ नागपूर येथील भूमी अभिलेख उपसंचालक दादा सोनतळपे व त्यांचा शिपाई भालचंद्र गलांडे याला पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती़ नागपूर येथील महसूल आयुक्त कार्यालयातील टिना सुरेश शादीजा या सहायकाला, कारंजा तालुक्यातील धर्तीचा पटवारी गोपाल पाटील, यवतमाळ येथील उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर भट यांना ३० हजारांची लाच स्वीकारताना, वर्धा येथील सरकारी वकिल घनश्याम अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्यात आली होती़ एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी शालिक मेश्राम व लेखाधिकारी धरतकर यांना वॉटर फिल्टर खरेदी प्रकरणात उघड चौकशी करून अनियमितता आढळून आल्याने चंद्रप्रकाश पिंपळे यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली़
या कारवाईमध्ये एसीबीचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनात उपपोलीस अधीक्षक अनिल लोखंडे, पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर, सारीन दुर्गे, सहायक प्रदीप देशमुख आदी कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)