मनरेगाच्या कामावर पाच तर मस्टरवर दाखविले पंचवीस मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 05:00 AM2022-04-27T05:00:00+5:302022-04-27T05:00:11+5:30
वरिष्ठ अधिकारी रोपवाटिकेत पोहोचत चौकशी करीत असल्याचे कळताच सामाजिक वनीकरण विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. आयुक्तांची बारकाईने पाहणी केली असता रोपवाटिकेत एकूण पाच मजूर बारमाही कामावर असताना सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी पटावर चक्क २५ मजूर दाखविल्याचे निदर्शनास आले. गौडबंगाल करणाऱ्यांनी चक्क या २५ मजुरांच्या नावाने देयकही काढल्याचे पुढे आले. आयुक्त चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहे.
अमोल सोटे
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : येथील सामाजिक वनीकरण कार्यालयांतर्गत विठ्ठलापूर रोपवाटिकेत भ्रष्टाचाराचा राक्षस चांगलाच मोठा झाल्याचा धक्कादायक प्रकार मनरेगा नागपूर विभागाच्या आयुक्तांच्या धडक चौकशीत नंतर पुढे आला आहे. कामावर पाच मजूर असताना मस्टरमध्ये तब्बल २५ मजूर दाखविण्यात आल्याचेही चौकशीत पुढे आले आहे. नागपूर विभागाचे मनरेगा आयुक्त शंतनू गोयल यांनी विठ्ठलापूर रोपवाटिकेला अचानक भेट दिली. वरिष्ठ अधिकारी रोपवाटिकेत पोहोचत चौकशी करीत असल्याचे कळताच सामाजिक वनीकरण विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. आयुक्तांची बारकाईने पाहणी केली असता रोपवाटिकेत एकूण पाच मजूर बारमाही कामावर असताना सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी पटावर चक्क २५ मजूर दाखविल्याचे निदर्शनास आले. गौडबंगाल करणाऱ्यांनी चक्क या २५ मजुरांच्या नावाने देयकही काढल्याचे पुढे आले. आयुक्त चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहे.
गरजूंना डावलण्यात मानली जायची धन्यता
- गरजू मजुरांनी कामाची मागणी करूनही अनेकांना डावलण्यात येत होते. हा प्रकार पिलापूर, जैतापूर, लहान आर्वी येथील काही मजुरांनी तक्रारीद्वारे मनरेगा विभागाला कळविला. त्याची दखल घेत मनरेगा नागपूर विभागाचे आयुक्त शंतनू गोयल यांनी विठ्ठलापूर रोपवाटिकेत तहसीलदारांच्या उपस्थितीत पाहणी केली.
वर्षभराच्या कामांचे होणार ऑडिट
- सामाजिक वनीकरण आष्टी कार्यालयांतर्गत वर्षभर झालेल्या कामाचे ऑडिट वरिष्ठ पातळीवरून करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात एकूण किती बनावट मजुरांच्या नावाने पैसे काढले हे अहवालाअंती स्पष्ट होणार आहे. चौकशी अहवालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहणार आहे.
पितळ उघडे पडू नये म्हणून २० मजुरांना दाखविले गैरहजर
- कामावर पाच मजूर असताना हजेरी पटावर २५ मजूर दररोज काम करीत असल्याचे दाखविले जात होते. ज्या दिवशी मनरेगा आयुक्तांचा दौरा झाला, त्यादिवशी आपले पितळ उघडे पडू नये म्हणून गैरप्रकार करणाऱ्यांनी तब्बल २० मजूर गैरहजर असल्याचे दाखविल्याचे आयुक्तांच्या प्रत्यक्ष पाहणीत पुढे आले आहे. प्रत्यक्ष पाहणीत अनेक गौडबंगाल पुढे आल्याने सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी के. व्ही. आत्राम यांना विचारणा केली असता त्यांनी कुठलेही उत्तर दिले नाही, हे विशेष.
मजूर म्हणून कर्मचाऱ्यांच्या नावांची नोंद
- सामाजिक वनीकरणच्या आष्टी येथील कार्यालयातील तीन कर्मचारी यांनाही चक्क मजूर म्हणून दाखवून मस्टर काढण्याचा पराक्रम संबंधित अधिकाऱ्याने केला आहे. वरिष्ठांचा कुठलाही वचक नसल्यामुळे हा सर्व प्रकार बिनबोभाटपणे सुरू होता. साहित्य खरेदीचेही अनेक बनावट देयक तयार करून ती मंजूर करून शासकीय निधीचा अपहार झाल्याचेही चौकशीत पुढे आले आहे.
प्रत्यक्ष पाहणीत अनेक गौडबंगाल पुढे आले आहे. याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात येणार आहे.
- शंतनू गोयल, आयुक्त, मनरेगा, नागपूर.
विठ्ठलापूर रोपवाटिकेत मनरेगा आयुक्त शंतनू गोयल यांनी पाहणी केली. यावेळी प्रत्यक्षात पाच मजूर कामावर होते. हजेरीपटावर २५ मजूर दररोज दाखविण्यात येत होते. दौऱ्याच्या दिवशी केवळ पाच मजूर उपस्थित होते. त्यामुळे आयुक्तांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले असून, संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्याला दोन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे.
- सचिन कुमावत, तहसीलदार, आष्टी (शहीद).