एकाच बिळात आढळले पाच अजगर
By admin | Published: March 26, 2017 01:06 AM2017-03-26T01:06:35+5:302017-03-26T01:06:35+5:30
भूगाव येथील किशोर निकोडे यांच्या शेतात असलेल्या एका बिळात अजगर असल्याची माहिती शनिवारी त्यांनी पीपल फॉर अॅनिमल्सला दिली.
पिपल्स फॉर अॅनिमलच्या माहितीवरून वनविभागाने पकडून जंगलात सोडले
वर्धा : भूगाव येथील किशोर निकोडे यांच्या शेतात असलेल्या एका बिळात अजगर असल्याची माहिती शनिवारी त्यांनी पीपल फॉर अॅनिमल्सला दिली. या माहितीवरून सदर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतात जात पाहणी केली असता बिळात अजगर असल्याचे दिसून आले. त्यांनी एक अजगर बाहेर काढला असता त्यात आणखी अजगर असल्याचे दिसून आले. त्यांनी या बिळातून एक दोन नाही तर तब्बल पाच अजगर काढले.
या अजगराची माहिती पिपिल्स फॉर अॅनिमलने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. या माहितीवरून क्षेत्र सहाय्यक एस आर परटक्के बिट गार्ड राजू धनवीज यांनीसुद्धा घटनास्थळ गाठले. त्यांच्या उपस्थितीत सदर पाचही अजगर उपवनसंरक्षक यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत पाचही अजगर बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले.
पिपल्स फॉर अॅनिमलचे आशिष गोस्वामी, अमित पिल्लई, सुमित जैन, कौस्तुभ गावंडे, अभिषेक गुजर यांच्यासह कार्यकर्त्यांनी अजगारांना बिळातून काढून वनविभागाच्या स्वाधीन केले.(प्रतिनिधी)
प्रजनन काळ असल्याने ते एकत्र असल्याचा संशय
अजगर हा सुस्त प्राणी आहे. सध्या त्याचा प्रजननाचा काळ आहे. यामुळे एकाच ठिकाणी पाच अजगर आढळून आल्याची शक्यता पिपल्स फॉर अॅनिमलने व्यक्त केली आहे. एकाच बिळात एवढे मोठे अजगर आढळण्याची कदाचित ही जिल्ह्यातील पहिली घटना असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.