नेत्ररोग निदान शिबिरातून पाच हजार रूग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 09:16 PM2019-01-28T21:16:22+5:302019-01-28T21:16:37+5:30
येत्या फेब्रुवारी महिन्यापासून स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट, आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा या तिन्ही तालुक्यांतील नेत्ररूग्णांच्या सेवेसाठी तब्बल १०० नेत्रतपासणी शिबिर आगामी सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये घेणार असल्याचा मानस केंद्रीय मंत्री जलसंधारण, नदीविकास व गंगा पुनर्जीवन भारत सरकार यांचे सल्लागार तसेच स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : येत्या फेब्रुवारी महिन्यापासून स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट, आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा या तिन्ही तालुक्यांतील नेत्ररूग्णांच्या सेवेसाठी तब्बल १०० नेत्रतपासणी शिबिर आगामी सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये घेणार असल्याचा मानस केंद्रीय मंत्री जलसंधारण, नदीविकास व गंगा पुनर्जीवन भारत सरकार यांचे सल्लागार तसेच स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
ही शिबिरे आर्वी विधानसभेतील सर्व २६ पंचायत समिती सर्कलमध्ये आवश्यकतेनुसार प्रतिसर्कल ३ ते ५ शिबिरे याप्रमाणे घेतली जातील, तर आर्वी, आष्टी व कारंजा शहराकरिता वेगळे मोठे शिबिर आयोजित करण्यात येईल. शिबिर घेताना त्या-त्या भागात काम करणाऱ्या शैक्षणिक संस्था, धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, पतसंस्था, महिला बचत गटांची, क्रीडा मंडळाची मदत घेतली जाईल. यापूर्वी आर्वी येथे, तर १३ जानेवारी रोजी गुरूदेव सेवा मंडळ व दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तळेगाव येथे १५५५ रूग्णांचे डोळे तपासल्या गेले. दोन्ही शिबिरे मिळून १३७२ रूग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. तर या दोन्ही शिबिरांमध्ये ७२२ मोतिबिंदू, काचबिंदूच्या शस्त्रक्रिया करावे लागणारे रूग्ण आढळून आले. त्यांच्या शस्त्रक्रिया २८ जानेवारीपासून सुरू करण्यात येत आहे. ट्रस्टच्या माध्यमातून यापूर्वीच आर्वी, आष्टी, तळेगाव व कारंजा येथे एक महिन्याचे मोफत शिवणकला प्रशिक्षण वर्ग सुरू आहे.
या प्रशिक्षणाकरिता ५००३ महिलांनी नावे नोंदविली असून आतापर्यंत ३०३० महिलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. सध्या या प्रशिक्षणाची तिसरी बॅच सुरू असून त्यामध्ये एकूण १६५० महिला प्रशिक्षण घेत आहेतस. यासंदर्भात बोलताना दिवे यांनी आर्वी विधानसभा क्षेत्रातील आवश्यकता असेल त्या सर्व महिलांना शिवणकला प्रशिक्षण दिल्या जाईल व याकरिता पुढील टप्प्यात जिल्हा परिषद सर्कल मुख्यालयात फिरते शिवणकला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल, असे सांगितले.
पत्रकार परिषदेला मदत फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव जयंत ढगे, सदस्य अमित कडवे, समन्वयक अशोक विजयकर, मंगेश चांदूरकर, सुनील इंगळे, विशाल गाडगे, सागर निर्मळ, जया चौबे, दिवाकर भेदरकर आदी उपस्थित होते.