पाच वर्षांत वर्धा वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत १० जणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 03:33 PM2021-02-08T15:33:29+5:302021-02-08T15:34:43+5:30
Wardha News वर्धा वनपरिक्षेत्रात वाघांच्या संख्येसह वन्यप्राण्यांची संख्याही अधिक आहे. संख्या वाढत असताना त्यांचा अधिवास, भ्रमणमार्ग खंडित होऊ लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वन्यप्राण्यांच्या वास्तव्य क्षेत्राचा संकोच झाल्याने मानव- वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. वर्धा वनपरिक्षेत्रात वाघांच्या संख्येसह वन्यप्राण्यांची संख्याही अधिक आहे. संख्या वाढत असताना त्यांचा अधिवास, भ्रमणमार्ग खंडित होऊ लागले आहेत. त्यामुळे वन्यजीव आणि मानव आमने-सामने येऊ लागल्याने संघर्ष वाढलेला आहे. गेल्या पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत तब्बल १० जणांना आपला जीव गमवावा लागला असून, २०६ व्यक्तींना गंभीर इजा पोहोचली आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांसह गंभीर जखमी झालेल्यांना वनविभागाकडून आतापर्यंत २२५ लाख ८ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. उन्हाळ्यात अशा घटना जास्त प्रमाणात घडतात. वनात पाणीटंचाई निर्माण होत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे वळतात. इतकेच नव्हेतर जंगल क्षेत्रालगत असलेल्या शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ असतोच.
वन्यप्राणी गावात प्रवेश करून जनावरांवर हल्ले, सरपण गोळा करणाऱ्या, शेतकाम करणाऱ्या अनेकांवर हल्ले करतात. त्यामुळे नागरिक जंगलात एकट्याने जाण्यास टाळतात. वनविभाग वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी विविध उपाययोजना करून नागरिकांना जंगलात जाण्यापासून सावध करीत आहे. मात्र वन्यप्राणी हल्ल्याच्या घटनेत घट झालेली नाही. या घटनांतील सर्व मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात घरचा कर्ता व्यक्ती गेल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर असून, भविष्यात मानव-वन्यप्राणी संघर्षातून कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
अनेकांना आले अपंगत्व
जिल्ह्यातील वन क्षेत्रात वाघ, बिबटे, अस्वल आदींसारख्या वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. अनेकदा शेतात काम करीत असलेल्या शेतकरी किंवा शेतमजुरांवर वन्यप्राणी हल्ले चढवितात. अशा घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांना तर कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.
मृतांसह जखमींना आर्थिक मदत
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गेल्या पाच वर्षांत जखमी झालेल्या २०६ जणांना १२२ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. तर मृत पावलेल्या १० व्यक्तींच्या कुटुंबाला १०३ लाख रुपयांची आर्थिक मदत वनविभागाकडून मिळाल्याची माहिती आहे.
वर्षनिहाय गंभीर झालेले व्यक्ती
वर्ष गंभीर अनुदान (लाखांत)
२०१६-१७ ३२ १९.२६
२०१७-१८ ४० १८.७५
२०१८-१९ ४५ २३.८६
२०१९-२० ६५ ४६.३६
२०२०-२१ २४ १४.३५
वर्षनिहाय मृत पावलेल्यांची संख्या
वर्ष मृत अनुदान (लाखांत)
२०१७-१८ ०३ २४.००
२०१८-१९ ०४ ३४.००
२०१९-२० ०३ ४५.००
.................................