पाच वर्षे पूर्ण तरी काम अर्धवटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:35 PM2018-04-26T22:35:31+5:302018-04-26T22:35:31+5:30
तालुक्यात विकासकामांवर कोट्यावधी रुपये खर्च करून विकासकामाचा झंझावात असल्याचे लोकप्रतिनिधी दाखवित आहेत. भूमिपूजन होवून आज पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना तहसील कार्यालय व आरोग्य विभागाची इमारत मात्र पूर्णत्त्वास गेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : तालुक्यात विकासकामांवर कोट्यावधी रुपये खर्च करून विकासकामाचा झंझावात असल्याचे लोकप्रतिनिधी दाखवित आहेत. भूमिपूजन होवून आज पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना तहसील कार्यालय व आरोग्य विभागाची इमारत मात्र पूर्णत्त्वास गेली नाही. यामुळे येथील विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२६ एप्रिल २०१३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सेलू तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाची नवीन इमारत व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. या अगोदरच बांधकामाला सुरुवात झाली होती. याच दिवशी तत्कालीन पाणी पुरवठा आणि स्वच्छता व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते तत्कालीन आमदार सुरेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला आता पाच वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत तहसील कार्यालयाची व रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थानाची इमारत आजही अर्धवटच आहे. नव्हे तर एक वर्षापासून निवासस्थानाच्या इमारतीचे बांधकाम थांबले आहे.
एकीकडे भूमिपून समारंभाचे सोहळे तालुक्यात सुरू असतांना या दोन महत्त्वपूर्ण इमारतीच्या बांधकामाकडे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्याचे दुर्लक्ष कसे हा तालुकावासीयांकरिता चर्चेचा विषय ठरत आहे.
तहसील कार्यालय अद्यापही भाड्याच्या इमारतीत
गत सहा वर्षांपुर्वी नव्या इमारतीकरिता तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडण्यात आली. त्या काळापासून येथील तहसील कार्यालयाचा कारभार भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे. त्यामुळे या इमारत बांधकामाला प्राधान्य देण्याची गरज आहे,अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली.
आरोग्यसेवेकडे दुर्लक्ष
कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची इमारत येथे नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नाही. तालुकावासियांना उत्तम आरोग्य सेवा मिळत नाही. या कारणामुळे निवास स्थानासाठी शासनाने निधी मंजूर केला; पण अर्धवट थांबलेले बांधकाम पाहुन विकासकामाच्या वेगावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
भूमिपूजन करणाऱ्यांनाच उद्घाटनाची संधी
या दोन्ही महत्त्वपूर्ण इमारतीचे भूमिपूजन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व लोकप्रतिनिधीनी केले. त्याला पाच वर्षे पूर्ण झाली. अर्धवट राहिलेल्या बांधकामासाठी पुन्हा आघाडी शासन येईल व काम पूर्ण होईल, ज्यांनी भूमिपूजन केले तेच उद्घाटन तर करणार नाही ना, अशी खोचक प्रतिक्रिया तालुकावासी या बांधकामाबाबत देत असल्याचे दिसते.