अतिक्रमणधारकांची समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:41 PM2018-03-11T22:41:34+5:302018-03-11T22:41:34+5:30
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना सदर जागेचे कायम स्वरूपी पट्टे मोफत देण्यात यावे, ....
ऑनलाईन लोकमत
वर्धा : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना सदर जागेचे कायम स्वरूपी पट्टे मोफत देण्यात यावे, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन रविवारी राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सादर करण्यात आले.
शासकीय जागांवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची आर्थिकस्थिती नाजूक आहे. त्यांना आपल्या स्वप्नातील घर बांधणेही कठीण वाटते. ज्या जागेवर ते राहत आहेत ती जागा शासकीय असली तरी झोपड्यांमध्ये त्यांनी संसार थाटला आहे. सदर जागेचे त्यांना अद्यापही कायमस्वरूपी पट्टे न मिळाल्याने त्यांना शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ घेता येत नाही. अतिक्रमण धारकांना जागेचे कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदारांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत देण्यात आली. परंतु, अद्यापही समस्या कायम आहे. सदर समस्येशी आपल्याला अवगत करून देण्यासाठी व समस्या निकाली निघावी यासाठी २२ फेब्रुवारीला युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर पोलिसांकडे रितसर आंदोलनासाठी परवानगी मागीतली;पण त्यांच्याकडून परवानगी नाकारण्यात आली.
शिवाय त्याच दिवशी आपण योगगुरू रामदेवबाबा यांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने सदर समस्या आपल्या पर्यंत आम्हाला मांडता आली नाही. वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना जागेचे नि:शुल्क पट्टे देण्यासाठी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास वर्धा ते नागपूर अशी भु-देव यात्रा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
निवेदन देताना निहाल पांडे, पलाश उमाटे, कोमल झाडे, सोनु दाते, अक्षय बाळसराफ, सौरभ मोकाडे, यश सातपूते, अनिकेत मुन, तेजस भोयर यांच्यासह युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अतिक्रमण धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चर्चेतही तोडगा नाही
स्थानिक जुना आरटीओ मैदान भागात आयोजित कार्यक्रमात निवेदन दिल्यानंतर युवा परिवर्तन की आवाजच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक विश्रामगृहात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी सदर मागणीवर निवेदन देऊन चर्चा केली. परंतु, यावेळी समाधानकारक तोडगा न निघाल्याने युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात २० ते २३ मार्च दरम्यान वर्धा ते नागपूर अशी भु-देव यात्रा काढण्यात येणार असल्याचे युवा परिवर्तन की आवाजचे निहाल पांडे यांनी सांगितले.