वर्धा जिल्ह्यातील पोथरा धरणावर फ्लेमिंगोचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 09:05 PM2019-06-08T21:05:07+5:302019-06-08T21:06:22+5:30

जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील पोथरा धरणावर देखण्या फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. एकूण पंचेचाळीस पक्ष्यांचा हा थवा ‘बहार’च्या पक्षी अभ्यासकांना आढळून आला.

Flamingo arrives at Pothra Dam in Wardha district | वर्धा जिल्ह्यातील पोथरा धरणावर फ्लेमिंगोचे आगमन

वर्धा जिल्ह्यातील पोथरा धरणावर फ्लेमिंगोचे आगमन

Next
ठळक मुद्देअग्निपंखांचं सौंदर्य न्याहाळण्याची संधी तब्बल ४५ पक्ष्यांचा थवा मुक्कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील पोथरा धरणावर देखण्या फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. एकूण पंचेचाळीस पक्ष्यांचा हा थवा ‘बहार’च्या पक्षी अभ्यासकांना आढळून आला. यामुळे पोथऱ्याच्या पक्षी वैभवात भर पडलेली आहे. पक्षीप्रेमींसाठी ही आनंदाची बाब असून 'अग्निपंखाचं' सौंदर्य न्याहाळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
पोथरा धरणावर अलीकडे हे पक्षी उन्हाळ्यात नियमित येत असल्याचे आढळून आलेले आहे. या वर्षीच्या उन्हाळ्यात मात्र रोहित पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत आढळून आलेले आहेत. पूर्वप्रकाशित वृत्तांचा संदर्भ घेत बहाराचे पक्षीनिरीक्षक दिलीप वीरखडे, राहुल तेलरांधे, दीपक गुढेकर व पार्थ वीरखडे यांनी सात जूनला पोथºयाला भेट दिली असता ही संख्या पंचेचाळीस आढळली. मोठा रोहित (ग्रेटर फ्लेमिंगो) हा भारताचा स्थानिक आणि स्थलांतर करून येणारा पक्षी आहे. साधारणत: गुजरात मधील कच्छ या भागातून मुख्यत्वे सागरी किनाºयावर स्थलांतर करतात. यासह महाराष्ट्रातील काही धरणांवर व तलावावर त्यांचा हिवाळी मुक्काम असतो. रोहित पक्ष्यांची वीण कच्छच्या रणात होते. वीण प्रदेशाकडे परत जात असताना अग्निपंखांच्या या थव्याने पोथºयावर थांबा घेतला असावा. पालक पक्षांसह तरुण पक्षांचा समावेश या थव्यात आढळला. लांबसडक मान आणि उंच असणारे पाय, फिकट गुलाबी रंग आणि गुलाबी लालबुंद चोच असलेल्या या पक्ष्यांच्या पाण्यातील शिस्तबद्ध हालचाली न्याहाळण्यासारख्या असतात. काळ्या पंखांवरील भडक केशरी रंगीत पिसांमुळे त्याची सामूहिक भरारी चित्त वेधून घेते. पोथरा धरणातील साठा कमी झाल्यामुळे उथळ पाण्यात त्यांना हवे असलेले खाद्य उपलब्ध आहे. गेली पाच-सहा दिवसांपासून असलेला मुक्काम कदाचित आणखी काही दिवस राहू शकतो. या पक्ष्यांसह आर्ली, उघड्या चोचीचा करकोचा, रंगीत करकोचा, पांढºया मानेचा करकोचा, चमचा, नदी सुरय, छोटा सुरय आदी अनेक पक्षी निरीक्षणादरम्यान आढळून आले.
समुद्र्रपूर तालुक्यातील पोथरा आणि लाल नाला हे दोन्ही क्षेत्र पक्ष्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अनेक पक्ष्यांच्या मोठ्या संख्येत नोंदी या धरणांवर सातत्याने घेण्यात येत आहेत. पोथरा आणि लालनाला यांना 'महत्त्वाचे पक्षी क्षेत्र' (इम्पॉर्टंट बर्ड एरिया) घोषित करण्यासंदर्भात बहार नेचर फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. वनविभागाने याची नोंद घेऊन पाठपुरावा करण्याची गरज आहे.
पक्ष्यांना त्रास होणार नाही याची जाणीव ठेवून निसर्गप्रेमींनी पक्षीनिरीक्षणाचा आनंद घ्यावा, असे आवाहन बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, बहारचे सदस्य वैभव देशमुख, दर्शन दुधाने, राहुल वकारे,मनीष ठाकरे यांनी केले आहे.

पूर्व विदर्भातील मोठ्या संख्येची पहिलीच नोंद
पूर्व विदर्भात अलीकडील नोंदींमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येची नोंद झालेली असण्याची शक्यता या निरीक्षकांनी व्यक्त केलेली आहे. पश्चिम विदर्भातील वाशीमजवळील एकबुर्जी तलावावर हे पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करून नियमित येतात. तीस ते चाळीसपासून शंभरच्या घरात त्यांची संख्या असते.

पोथरा आणि लालनाला हे महत्त्वाचे पक्षी क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी वनविभागाने पाठपुरावा करावा. तसेच या दोन्ही ठिकाणी निसर्गप्रेमींसाठी पक्षी वाचन केंद्र उभारावे.
दिलीप वीरखडे, सचिव, बहार नेचर फाऊंडेशन

Web Title: Flamingo arrives at Pothra Dam in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.