हंगामी व्यवसायातून युवकांची भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 10:23 PM2019-07-09T22:23:19+5:302019-07-09T22:24:38+5:30
समाजव्यवस्थेत अद्याप मागास जाती-जमातीतील कुटुंबांना जगण्याचा आधार शोधावा लागत आहे. वर्तमान स्थितीत सर्वत्र बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, बहुरूपी समुदायातील अल्पशिक्षित तरुणांनी स्वबळावर हंगामी बहुआयामी व्यवसायाची उभारणी केली आहे. यातून गिरडच्या बहुरूपी युवकांनी पारिवारिक जीवन जगण्याचा मार्ग सुकर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : समाजव्यवस्थेत अद्याप मागास जाती-जमातीतील कुटुंबांना जगण्याचा आधार शोधावा लागत आहे. वर्तमान स्थितीत सर्वत्र बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, बहुरूपी समुदायातील अल्पशिक्षित तरुणांनी स्वबळावर हंगामी बहुआयामी व्यवसायाची उभारणी केली आहे. यातून गिरडच्या बहुरूपी युवकांनी पारिवारिक जीवन जगण्याचा मार्ग सुकर केला आहे. या तरुणानी पिढीजात व्यवसायाला बगल देत आम्ही बहुरूपी म्हणून जन्मलो असलो तरी उद्योजक होऊन मरणार, असा निश्चय केला आहे.
गिरड येथील राम किसना शिंदे, श्याम किसान शिंदे यांनी समाजातील इतर युवकांना चालना दिली आहे. यात महादेव शिंदे, गंगाधर शिंदे, अनिल शिंदे, रूमा शिंदे, विठ्ठल माहुरे, वर्षा माहुरे, लक्ष्मण माहुरे यांचा समावेश आहे.
गिरड येथे वास्तव्यास आलेल्या १० बहुरूपी कुटुंबीयांनी पिढीजात व्यवसायाला बगल देत हंगामी बहुआयामी उद्योगाची उभारणी केली आहे. या उद्योगातून वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करण्यात यश मिळाले आहे. वडिलोपार्जित बहुरूपी सोंग घेऊन नागरिकांचे मनोरंजन करून मिळणाऱ्या भिक्षेत जगणाºया या कुटुंबातील नवयुवकांनी पारंपरिक जगण्याच्या साधनाला बगल देत जमेल तो व्यवसाय करून जीवन जगण्याचा मार्ग सुकर केला आहे.
परिस्थितीनुसार चार-दोन वर्ग शिक्षण घेण्याचा प्रयत्न या युवकांनी केला. काहींनी शाळेचा दरवाजा ओलांडला नाही. मात्र, वर्षाला लाखो रुपयांचे गणित कुटुंबाच्या जगण्यासाठी मांडण्यात यशस्वी ठरले आहे. बहुरूपी कुटुंबातील सहा युवक हंगामानुसार विविध व्यवसाय करतात. मच्छरदाणी, चटई, बाज, चादर, ड्रम, खुर्ची, घरगुती वापरातील साहित्य खरेदी करून गावखेड्यात विक्री करतात. महिन्याला एक कुटुंब पन्नास हजारांचा माल खरेदी करते. प्रत्येकजण जवळपास सहा लाखांच्या साहित्याची खरेदी करतो. संयुक्तिकरीत्या जवळपास एक कोटी रुपयांची उलाढाल केली जाते .
प्रत्येक कुटुंब ५० हजारांचे साहित्य विक्रीतून महिन्याला दहा ते बारा हजार रुपये कमावतात. यातून वाहतूक व अन्य खर्च वगळता महिन्याचा प्रपंच चालेल एवढे पैसे पदरी पाडतात. मात्र, या कुटुंबीयांना व्यवसाय उभारणीसाठी शासकीय कुठल्याही योजनेचा लाभ मिळाला नाही. शिवाय कुठल्याही बँकेने कर्जाची उपलब्धता करून दिलेली नाही. या युवकांनी स्वबळावर उभारलेला बहुआयामी व्यवसाय सुशिक्षित बेरोजगार युवकांना प्रेरणादायी ठरणारा आहे.