आर्वी तालुक्यात पुराचा हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 05:00 AM2021-09-10T05:00:00+5:302021-09-10T05:00:07+5:30

बाकळी नदीचे पाणी नांदपूर आणि शिरपूर गावात शिरल्याने घरामध्येही पाणी साचले होते. नांदपुरातील १४ घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. देऊरवाडा येथील वर्धा नदीच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. निम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने सुमारे तीनशे एकर शेती वर्धा नदीच्या पाण्याखाली आल्याने शेतात जाण्यास मार्गच राहिला नाही.

Flood in Arvi taluka | आर्वी तालुक्यात पुराचा हाहाकार

आर्वी तालुक्यात पुराचा हाहाकार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
देऊरवाडा/आर्वी : वर्धा नदी दुथडी भरून वाहत असल्याने या पूर परिस्थितीचा अनेक गावांना फटका बसला आहे. तालुक्यातील ३० ते ४० घरांची पडझड झाली असून अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. बुधवारी तालुक्यात ११४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत तालुक्यात ६९९.१९ मिमी पाऊस झाला आहे. वर्धा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गुरुवारी सकाळपासून आर्वी-अमरावती मार्ग बंद झाला आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या. 
बुधवारी रात्री तळेगाव (श्याम.पंत) ते आर्वी मार्ग हा वर्धमनेरी येथील पुलावरून पाणी असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. या पुरामध्ये चार बस अडकल्याने त्या बसमधील प्रवाशांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था वर्धमनेरी येथील आश्रमात करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता या बस तळेगाव, कारंजा व ढगा या मार्गाने काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. बाकळी नदीचे पाणी नांदपूर आणि शिरपूर गावात शिरल्याने घरामध्येही पाणी साचले होते. नांदपुरातील १४ घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. देऊरवाडा येथील वर्धा नदीच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. निम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने सुमारे तीनशे एकर शेती वर्धा नदीच्या पाण्याखाली आल्याने शेतात जाण्यास मार्गच राहिला नाही. तसेच या शेतातील पिकेही पाण्याखाली आल्याने धोका निर्माण झाला. आर्वी नगरपालिकेच्या हद्दीतील मायबाई वॉर्डातील दगडी पूल आणि अवघड वॉर्ड परिसरात मुख्याधिकारी आणि नगरपालिकेच्या पथकाने पाहणी केली. यावेळी सर्व घरे सुरक्षित होती; परंतु आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. श्रीराम शाळा व गुरुनानक धर्मशाळा या ठिकाणी तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

बाकळी नदीसह गावालगतच्या नाल्याला पूर आल्याने शिरपूर, जळगाव व नांदपूर या गावात पाणी शिरले. त्यामुळे बाधित होण्याची शक्यता असलेल्या लोकांना गावातील शाळेत स्थलांतरित करण्यात येत आहे. अप्पर वर्धा व निम्न वर्धा प्रकल्पातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत प्रभावित होणाऱ्या गावातील सर्व सरपंच, पोलीस पाटील यांना अवगत करून गावातील शाळा उघडून देण्याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आल्या. तसेच या प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग लक्षात घेत गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
विद्यासागर चव्हाण, तहसीलदार आवी. 
 

Web Title: Flood in Arvi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.