वर्धा जिल्ह्यात पूर परिस्थिती; लहान गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:45 PM2019-08-26T12:45:21+5:302019-08-26T12:45:45+5:30
वर्धा जिल्ह्यातील जाम भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे व वाहतूक ठप्प झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: रविवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील जाम भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे व वाहतूक ठप्प झाली आहे. या पुलावरून एसटी बस नेण्याच्या प्रयत्नात ती पुलाखाली जाण्याची दूरवस्था ओढवली होती. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याने बस पुलावरून पलिकडच्या काठावर सुरक्षित नेली.
मांडगाव-शेडगाव चौरस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. येथील जवळपासच्या सर्व शेतांमध्ये पाणी साचून पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील नाल्यांच्या खोलीकरणाची मागणी गावकऱ्यांनी आजवर वारंवार केली. मात्र त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. जेव्हा मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा हे नाले दुथडी भरून वाहतात व गावकºयांचे जगणे नकोसे करून टाकतात असे गावकºयांचे सांगणे आहे.