वाई पुलावरून पुराचे पाणी; रहदारी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:27 PM2019-07-31T23:27:42+5:302019-07-31T23:28:04+5:30
नजीकच्या वाई येथील नाल्यावरून असलेल्या मोडक्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रोहण्यावरून वाई-पिंपळधरी येथे व वाई-पिंपळधरीवरून बाहेरगावी जाणारे प्रवासी विद्यार्थी, शेतकरी व शेतमजुरांची रहदारी ठप्प आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : नजीकच्या वाई येथील नाल्यावरून असलेल्या मोडक्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रोहण्यावरून वाई-पिंपळधरी येथे व वाई-पिंपळधरीवरून बाहेरगावी जाणारे प्रवासी विद्यार्थी, शेतकरी व शेतमजुरांची रहदारी ठप्प आहे. पूल मागील पाच वर्षांपासून मोडकळीस आला असून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. बांधकाम विभागाने गावकऱ्यांच्या या मागणीकडे कायम दुर्लक्ष केल्याने वाई-पिंपळधरी येथील जनजीवन ठप्प झाले आहे.
वाई-पिंपळधरी ही दोन्ही गावे आदिवासीबहुल असून गावातून बाहेर वळताना गावाला वळसा घेत वाहणाºया नाल्यावरील पुलावरून येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या नाल्यावरील पूल खोल असून पुलावर मोठ-मोठे खड्डे आहेत. सलाखी उभ्या पडल्या आहेत. थोड्या पावसाने सदर पुलावरून पाणी वाहते, पूल दुरुस्त व्हावा, तो उंच करून दोन्ही बाजूला कठडे बसवा, अशी मागणी मागील पाच वर्षांपासून ग्रामस्थ करीत आहेत. चार वर्षांपूर्वी वसंत पुनवटकर पूल ओलांडताना वाहून गेला. दोन गावातील विद्यार्थी पुलावरून जीव मुठीत घेऊनच ये-जा करताना करतात. दोन वर्षांपासून मोठा पाऊस न झाल्याने समस्येची तीव्रता जाणवली नाही; आता सुरू असलेल्या संततधार पावसाने पूल पाण्याखाली आला. परिणामी, रोहण्यातील ज्यांची शेती वाई-पिंपळधरी शिवारात आहे, ते शेतात जाऊ शकत नाही, तर वाई-पिंपळधरी येथील विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही.
गावातील नागरिक, आवश्यक गरजा भागविण्यासाठी गावाबाहेर जाऊ शकले नाहीत. पूल दुरुस्तीला आणखी एखाद्या नागरिक वाहून जाण्याची प्रतीक्षा आहे की काय, अशी नाराजीची प्रतिक्रिया माजी सरपंच गणेश गजकेश्वर यांनी व्यक्त केली.