कापूस दरात चढ-उतार शेतकरी चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:17 AM2018-01-02T00:17:11+5:302018-01-02T00:18:06+5:30
राज्यात उत्कृष्ट कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : राज्यात उत्कृष्ट कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले आहे. यामुळे शेतकरी संकटात असताना कापसाचे भावही मागील दोन-तीन दिवसांत ५ हजार १०० रुपयांवर आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
वर्धा जिल्ह्यात खरीपात कापूस हेच मुख्य पीक आहे. यावर्षी कापसावर लाल्या व बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. परिणामी, कापसाचे बोंड पूर्णत: सडून गेले. त्यातून कापूस निघाला नाही. अनेक शेतकºयांनी डिसेंबर महिन्यातच कपाशी उपटून फेकली. यामुळे यावर्षी कापसाचे उत्पादन घटले आहे. एकरी उत्पादनातही मोठी घट आल्याने कापसाचे भाव तेजीत राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. डिसेंबर महिन्याच्या पुर्वार्धात कापसाचा भाव ५६०० रुपये क्विंटलपर्यंत वाढला होता; पण डिसेंबरच्या अंतिम आठवड्यात हा भाव आता ५१०० रुपयांवर आला आहे. यावर्षी शेतकºयांना कपाशीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागला. कपाशी उंच वाढल्याने फवारणीचाही खर्च वाढला. शिवाय कापसाच्या वेचाईचे काम रोजीचे मजूर लावून करावे लागले. यामुळे किलोमागे दीडशे रुपये अतिरिक्त मोजावे लागले. आधीच शेतकरी अडचणीत असताना बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शासनाकडून आर्थिक मदत देण्याची घोषणा नागपूर हिवाळी अधिवेशनात करण्यात आली. प्रती हेक्टर ३० हजार रुपये मदत देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी अद्याप याबाबत कुठलीही कार्यवाही सुरू झालेली नाही. काही भागात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. कापसाला बोनस जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलनातून केली होती; पण शासनाने बोनस जाहीर केला नाही. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट, आर्वी हे सर्वात मोठी कापसाची बाजारपेठ आहे. येथे भाव अतिशय कमी आहे. व्यापारी सरकारच्या हमीभावापेक्षाही कमी भाव देत असल्याने शेतकºयांची अडचण वाढली आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी कापसाचा भाव वाढेल म्हणून कापूस विकाला नाही; पण आता भाव ५१०० रुपयांवर आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.
शासकीय खरेदी थंडच
कापूस पणण महासंघ, नाफेड व सिसीआय मार्फत कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण जिल्ह्यात शासकीय कापूस संकलन केंद्रावर फारशी कापसाची खरेदी झाली नाही. अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस प्रारंभीच व्यापाऱ्यांना विकल्याने त्यांना अल्प भाव मिळाला.
कापसाचे दर दिवसेंदिवस घसरत आहे. उत्पादन खर्च अधिक झाला. बोंडअळी व इतर रोगांनी कपाशीचे उत्पन्न नाममात्र झाले. शासनाने एकरी भरघोस मदत दिली तरच शेतकरी सावरू शकतो. अन्यथा कर्जमाफीनंतरही पुन्हा शेतकऱ्यांच्या नशिबी कर्जबाजारीपणा ठरलेलाच आहे. कपाशीला चांगले भाव मिळणे आवश्यक आहे.
- पप्पू बोबडे, प्रगतशील युवा शेतकरी, वडगाव (कला), ता. सेलू.
कापसाचे कमी-जास्त होणारे भाव शेतकऱ्यांना बुचकळ्यात टाकणारे आहे. या आठवड्यात ५५०० रुपयांपर्यंत असलेले भाव ५००० रुपयांवर आले आहेत. अनेकांनी ६ हजार रुपयांपर्यंत भाव अपेक्षित धरून कापूस साठवून ठेवला आहे. आधीच कमी उत्पादनामुळे शेतकरी अडचणीत असताना तो व्यापाºयांच्या भावबाजीत भरडला जाऊ नये.
- संतोष मरघाडे, शेतकरी, देवळी.
बाजारपेठेत सरकीला उठाव नाही. यामुळे कापसाचे भाव कमी आहेत. शिवाय आवक कमी असल्यानेही भाव पडत आहेत. सद्यस्थितीत आठवडाभर तरी भाव वाढण्याची शक्यता नाही.
- गुड्डू चांडक, व्यापारी, आर्वी.