कवितांच्या प्रेमबंधाने फुलले वृद्धाश्रमातील सुरकुतलेले चेहरे
By admin | Published: July 1, 2017 12:35 AM2017-07-01T00:35:34+5:302017-07-01T00:35:34+5:30
आधुनिक काळात माणसाची विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. यात नातेसंबध दुरावत असल्याचे दिसून येते.
मातोश्री वृद्धाश्रमात कवी संमेलन व वृक्षारोपण : कवितेच्या माध्यमातून मांडल्या व्यथा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आधुनिक काळात माणसाची विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. यात नातेसंबध दुरावत असल्याचे दिसून येते. वृद्धापकाळात मुलांनी मातापित्याचे पालन करावे ही सामाजिक व संवैधानिक बांधिलकी आता संपत असल्याचे निदर्शनास येते. वृद्धांच्या समस्याही जटील होत आहे. संवदेनशील मन दु:खांना समजून घेऊअ शकते. त्यांच्या व्यथा मआंडून त्यांच्या चेहऱ्यावर काही काळासाठी हसू फुलविणारे ठरू शकते याचा प्रत्यय नुकताच आला.
राष्ट्रीय कवी कला मंच, वर्धा यांच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रमात निमंत्रितांचे कवी संमेलन घेण्यात आले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ होते तर प्रमुख पाहुणे डॉ. अनवर अहमद सिद्दीकी, प्रा. दत्तानंद इंगोले, प्रभाकर पाटील, मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सुरेश परसोडकर, राष्ट्रीय कवी कला मंचाचे संयोजक रमेश खुरगे उपस्थित होते.
कविसंमेलनात विविध आशयाच्या कविता सादर करण्यात आल्या. प्रा. प्रमोद नारायणे यांनी ‘तीर्थरुप आई बाबास’ या कवितेतून ‘बाबा तुम्ही ठरलात कालबाह्य भूतकाळ, वर्तमानाच्या आभासी जगात वापरतांना भविष्याची भरमसाठ डिपॉझिट करण्याच हव्यास सोडत नाही, आमचा पिच्छा, म्हणूनच तुमच्या अस्तित्वाला आम्ही लोटत असतो दूर’ अशी दोन पिढ्यातील तफावत विशद करणाऱ्या कवितेतून वृद्धांचे जीवन वास्तव्य मांडले.
रमेश खुरगे यांनी ‘जंजीर’ कविता सादर केली. ‘शादी के बाद शेर को, उसने कुत्ता बना दिया, जो दहाड रहा था, आज दुम हिला रहा’ अशा शब्दात कुटुंब व्यवस्थेचे वास्तव मांडले. सुनील सावध यांनी ‘कुणी तरी हवं वाढदिवसाला’ या शीर्षकाची ‘मैदान जिंकावे म्हणतो कितीदा वाढदिवसाला’ कविता सादर केली. तर मीरा इंगोले यांनी शेतकऱ्यांची आत्महत्येचे कारण सांगतांना सावकारी कर्ज फेडता न आल्याने जप्ती साहेबांची येता मरणा कवटाळले’ अशा आशयाची कविता सादर केली. प्रा. जनार्दन ददगाळे यांनी ‘क’च्या कवितेतून म्हातारपणात विद्यार्थी, शिक्षकांचा आधार होऊ शकतो असा आशावाद स्पष्ट केला. दत्तानंद इंगोले यांनी ‘दीक्षाभूमी’ ही सामाजिक आशयाची कविता सादर केली.
कवी संमेलनात डॉ. रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ यांनी कविता सादर करुन रसिकवृद्धांची दाद मिळविली. डॉ. अनवर अहमद सिद्दीकी यांनी जीवनविषयक भाष्य करणाऱ्या दोन गझल सादर केल्या. मातोश्री वृद्धाश्रमातील गिरीजाप्रसाद शुक्ला यांनी कवी संमेलनात सहभागी होवून ‘कैसी प्रगती’ कविता सादर केली. प्रभाकर पाटभल यांनी ‘अवहेलना दिन’ची कविता सादर करुन वृद्धाची समस्या मांडली. प्रा. अरविंद पाटील यांनी पावसावर ‘वैरी’ कविता सादर केली. यासह कवी संमेलनात डॉ. विद्या कळसाईत यांनी ‘उडान’, प्रशांत ढोले यांनी ‘पाऊस’, दिलीप गायकवाड यांनी ‘जूने दिवस’, संजय भगत यांनी ‘धुपट’, मोहन चिचपाने यांनी ‘जुने दिवस’, गणेश वाघ यांनी ‘दु:ख’, सुरेश मेश्राम यांनी ‘दुष्काळी मौसम पाण्याचा’ आणि डॉ. भास्कर नेवारे यांनी ‘गोंदन’ या कविता सादर केल्या.
याप्रसंगी सुनील सावध यांच्या हस्ते मातोश्री वृद्धाश्रमात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रा. वनिता सावध, दिप्ती ससनकर, विठ्ठल गुल्हाणे, विनय डहाके, ईश्वर पवार, पाटील, कवी सुरेश सत्यकार, सुरेश बोरकर, प्रितेश मकेश्वर आदींची उपस्थिती होती.
उपस्थित वयोवृद्धांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. यानिमित्ताने सुनील सावध व रमेश खुरगे यांच्यातर्फे अल्पोहार व फळवाटप करण्यात आले. वृद्धाश्रमात अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन व्यवस्थापनाने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक रमेश खुरगे यांनी केले. संचालन मीरा इंगोले यांनी तर आभार डॉ. विद्या कळसाईत यांनी मानले. कवी संमेलनामुळे सुरकुतलेल्या चेहऱ्यावर काही वेळाकरिता आनंद झाल्याचे पाहायला मिळाले.