शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देण्यावर भर द्या

By admin | Published: September 16, 2015 02:51 AM2015-09-16T02:51:32+5:302015-09-16T02:51:32+5:30

राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजना अंतर्गत केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा, .....

Focus on providing basic amenities to farmers | शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देण्यावर भर द्या

शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देण्यावर भर द्या

Next

किशोर तिवारी : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे सांत्वन, वडनेर रुग्णालयाची केली पाहणी
वर्धा : राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजना अंतर्गत केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा, आरोग्य, शिक्षण या सुविधा शासनाकडून देण्यात येत आहे. या सुविधांची पाहणी करण्यासाठी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन समुद्रपूर, धोंडगाव, दारोडा, वडनेर येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूबांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
आरोग्य, अन्न, शिक्षण, पाणी यासह मुलभूत सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यावर भर देण्याच्या सूचनाही तिवारी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. समुद्रपूर तालुक्यातील धोंडगाव येथील दिलीप बचाटे या आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबांच्या घरी जाऊन कुटुंबांचे सांत्वन केले. यावेळी बचाटे यांची पत्नी कुसुम बचाटे, मुलगा निखिल, रितेश, मुलगी निकिता यांच्यासोबत संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच वडनेर येथील विठ्ठल वावधने या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन मुलगा रामकृष्ण यांच्यासोबत संवाद सांत्वन केले. वडनेरच्या छाया कुंभलकर यांना शासनातर्फे योग्य ती सर्व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी तिवारी यांनी दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. चव्हाण, समुद्रपूरचे तहसीलदार सचिन यादव, हिंगणघाट तहसीलदार दीपक कारंडे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, वीज कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. रुग्णालयातील रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णालयाचे डॉ. खेळकर यांनी सविस्तर माहिती दिली. वडनेरच्या ग्रामीण आरोग्य केंद्रातील सुविधा, उपकरणे, यंत्र आदींबाबत पाहणी केली. यावेळी डॉ. विवेक दुर्गे यांनी आरोग्य केंद्राबाबत माहिती दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवेबाबत माहिती तिवारी यांना दिली.
दारोडा येथे अन्नधान्य सुरक्षा योजनेअंतर्गत केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने देण्यात येत असलेल्या अन्नधान्याच्या पुरवठ्याबाबत तिवारींनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत शिधापत्रिकांची पाहणी केली. यावेळी जि.प. सदस्य वसंत आंबटकर, वडनेर सरपंच विनोद वानखेडे, प्रशांत कोल्हे व ग्रामस्थ उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Focus on providing basic amenities to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.