फोडर कॅफेटरियाने चारा टंचाईवर मात
By admin | Published: September 7, 2015 02:10 AM2015-09-07T02:10:32+5:302015-09-07T02:10:32+5:30
पशुधनाच्या संगोपनासाठी अत्यंत फोडर कॅफेटरिया हा प्रकल्प राज्यात पहिला ठरला आहे.
वर्धा : पशुधनाच्या संगोपनासाठी अत्यंत फोडर कॅफेटरिया हा प्रकल्प राज्यात पहिला ठरला आहे. या प्रकल्पामुळे चारा टंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. शिवाय संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसह स्वयंसेवी तसेच शैक्षणिक संस्थांनी नांदपूर येथील पशुवैद्यकीय चिकित्सा केंद्रातील फोडर कॅफेटरियाला प्रत्यक्ष भेट दिली. यातील चाऱ्याच्या २४ प्रजातीबद्दल माहिती जाणून घेतली. राज्यातील शेतकऱ्यांनी चाऱ्याच्या लागवडीसाठी आवश्यक असलेले बेणे उपलब्ध करून घेतले आहे.
जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील नांदपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात देशाच्या विविध भागातून पशुखाद्यासाठी उपयुक्त, बाराही महिने जनावरांना आवश्यक असणारा सकस चारा उबलब्ध व्हावा म्हणून २४ प्रजातींचे संवर्धन केले आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. सतीश राजू व जिल्हा पशुधन अधिकारी अनिरूद्ध पाठक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने हा कॅफेटरिया विकसित केला आहे.
सकस चारा मिळत नसल्याने पशुपालकांसमोर गुरांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कॅफेटरियाच्या माध्यमातून त्यावर मात करणे शक्य असल्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यात आला आहे. राज्यातील या अभिनव उपक्रमाची माहिती घेण्यासाठी सातारा, सांगली, नांदेड, औरंगाबाद, बीड तसेच अत्यंत पाण्याची टंचाई असलेल्या भागातूनही शेतकरी समूहाने येऊन चारा संवर्धनाच्या या प्रकल्पाची माहिती घेत आहेत. त्यासोबतच चाऱ्याचे बियाणे तसेच बेणे सोबत घेऊन आपल्या शेतात चारा लागवडीला सुरूवात करीत आहेत. या प्रकल्पाला जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याच्या बाहेरील सरपंच व शेतकरी दररोज भेट देत असून पशुधन संवर्धनासाठी चाऱ्याच्या प्रजाती आपल्या गावात लागवड करण्यासाठी मार्गदर्शन घेत आहेत.
मागील १५ दिवसांमध्ये शेवरी प्रजातीच्या चाऱ्याचे ५० किलो बियाणे, तीन हजार चाऱ्याचे रोपटे व चाऱ्याच्या प्रजातींचे बेणे शेतकऱ्यांना पशुसंवर्धनच्या फोडर कॅफेटरियामधून उपलब्ध करून देण्यात आले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)