वनकर्मचाऱ्यांकडून चारा पिकाची सवंगणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:10 AM2018-06-03T00:10:46+5:302018-06-03T00:10:46+5:30
खरांगणा तथा हिंगणी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाने शेतकरी, शेतमजूरच नव्हे तर वन विभागालाही त्रस्त केले आहे. वाघांनी कड्याळूच्या शेतात बस्तान मांडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. परिणामी, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : खरांगणा तथा हिंगणी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाने शेतकरी, शेतमजूरच नव्हे तर वन विभागालाही त्रस्त केले आहे. वाघांनी कड्याळूच्या शेतात बस्तान मांडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. परिणामी, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर पर्याय म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी स्वत: हजर राहून वनमजुरांकडून शेतकऱ्यांच्या शेतातील कड्याळू कापून घेत आहेत.
खरांगणा व हिंगणी वन परिक्षेत्रांतर्गत सुसूंद, सुसंंूद (हेटी), बोरगाव (गोंडी), माळेगाव (ठेका), रायपूर, आमगाव आदी गावांत वाघाने धुमाकूळ घातला आहे. सुसंूद, बोरगाव (गोंडी) भागात तर पाळीव प्राण्यांच्या शिकारीचा सपाटाच लावला. याच काळात आमगावातील चेतन खोब्रागडे या युवकाचा बळी गेला. दररोज वेगवेगळ्या भागात वाघाचे दर्शन होत आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या कड्याळूचा भाग वाघाने आश्रयस्थान बनविल्याने चारापीक काढता आले नाही. आता खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. अशा वेळी चारापीक काढून शेतीची मशागत करावी लागणार आहे; पण चारापीक सवंगणी करायला कसे जायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता. यावर वनविभाग मदतीला धावून आला. वनविभागाचे अधिकारी स्वत: हजर राहून वनरक्षक व वनमजुराला सोबतीला आणत चारा पिकाची सवंगणी करीत आहेत.
वाघाने वनमजुरांना बनविले शेतमजूर
शेतकरी, शेतमजुरांमध्ये वाघाने धडकी भरविली आहे. परिणामी, यंदा खरीपाची पेरणी, जागली कशी करावी, ही चिंता त्यांना त्रस्त करीत आहे. मदनी, बोरखेडी, आमगाव (म.) भागापर्यंत वाघाने मजल मारली आहे. शिवाय खरांगणा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बोरखेडी गावात सलग तीन दिवसांपासून बिबटही आपल्या पिल्लांसह गावात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती तथा संतापही दिसून येत आहे.
शेतकºयाने तशी भीती व्यक्त केली तर स्वत: हजर राहून वनरक्षक व वनमजुरांना मदतीला देऊन कड्याळूची कापणी करतो. काल-परवा मेघराज पेठे नामक शेतकऱ्याने कड्याळू पिकात वाघ असल्याचे सांगितले. स्वत: गेलो व वनकर्मचाऱ्यांना सवंगणी करायला लावली. शेतकरी दहशतीत आहे, हे खरे आहे. यात आमचीही दमछाक होत आहे.
- ए. एस. ताल्हण, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणी.