वर्धा जिल्ह्यात यंदा चारा टंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 03:06 PM2019-03-29T15:06:36+5:302019-03-29T15:07:56+5:30
गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पाचशेवर गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पाचशेवर गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक गावांतील जनावरे दुसऱ्या गावात स्थानांतरित करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात खरिपात प्रमुख पीक कापूस व सोयाबीन हेच आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने चाराटंचाईचा प्रश्न मार्च महिन्यानंतर भेडसावू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या गुरांच्या बाजारात जनावरे विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. काही भागात सोयाबीनचे कुटार चारा म्हणून वापरले जाते. परंतु, यावर्षी सोयाबीनवरही रोग आला. उत्पादन घटले, त्यामुळे चाºयाची टंचाई जाणवत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले असले तरी भूगर्भातच पाणीसाठा कमी होत असल्याने ग्रामीण व शहरी भागात केला जाणारा पाणीपुरवठा कपात करण्यात आला आहे. वर्धा शहरासह ११ गावांना दरररोज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जात होता. धाम नदी, पवनार व येळाकेळी येथून पाणीपुरवठा कमी होत असल्याने शहरात आता दहा दिवसानंतर नळ येतात. मोठ्या गावांमध्येही ही परिस्थिती आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात शेतकरीही यावेळी अडचणीत आहे. प्रशासनाने आष्टी तालुक्यात चारा छावणी मंजूर केली आहे, मात्र अद्याप छावणी सुरू झाली नसल्याची माहिती आहे. तसेच जिल्ह्यातील या गावात पाणी कमी आहे. तेथे चारा टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याने जनावरे मोठ्या प्रमाणावर स्थानांतरित केली जात आहेत.