११६ लाभार्थ्यांना वैरण बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 10:03 PM2019-05-19T22:03:39+5:302019-05-19T22:04:14+5:30
२०१८-१९ च्या जिल्हा वार्षिक योजना दुभत्या जनावरांना वैरण उपलब्ध करण्यासाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेला २० लाखांचा निधी प्राप्त झाला होता. प्रतिलाभार्थी रु. १५०० च्या मर्यादेमध्ये वैरण बियाणे मका, ज्वारी, बाजरी, यशवंत, जयवंत प्रजातीचे ठोंबे १०० टक्के अनुदानावर मोफत पुरविण्यात आले.
सुधीर खडसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : २०१८-१९ च्या जिल्हा वार्षिक योजना दुभत्या जनावरांना वैरण उपलब्ध करण्यासाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेला २० लाखांचा निधी प्राप्त झाला होता. प्रतिलाभार्थी रु. १५०० च्या मर्यादेमध्ये वैरण बियाणे मका, ज्वारी, बाजरी, यशवंत, जयवंत प्रजातीचे ठोंबे १०० टक्के अनुदानावर मोफत पुरविण्यात आले. समुद्रपूर तालुक्यातील ११६ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत चाराटंचाईवर यशस्वीरीत्या मात केली.
तालुक्यातील बोथली येथील वाल्मीक सेलवटे यांच्याकडे ५ संकरित गाई, ८ नागपुरी म्हैस आणि ४ बैल असून १०० लिटर दुधाची ते जाम येथे विक्री करतात. योजनेंतर्गत त्यांनी शेतात वैरण पिकांची लागवड केल्याने टंचाईच्या काळातही जनावरांकरिता मुबलक चारा उपलब्ध आहे. दहेगाव येथील विकी सहस्त्रबुद्धे यांच्याकडे १० गाई, ३ म्हैस, २ बैल आणि ७ वासरे आहेत. मुरादपूर येथील चंद्रभान हिवसे यांच्याकडे २ बैल ५ गाई व इतर जनावरे आहेत. निंभा येथील मोरेश्वर बागेश्वर यांना पशुसंवर्धन विभागाच्या योजनेमधून २ दुधाळ जनावरे वाटप करण्यात आली. सध्या त्यांच्याकडे २ बैल, २ संकरित गाई आणि २ कालवडी आहेत. तसेच विनोद महादेव नारनवरे यांच्याकडे २ बैल, २ संकरित गाई, २ गोºहे आणि १ कालवड असुन असून त्यांनीही वैरण बियाणे लागवड करीत चाराटंचाईवर मात केली.
चारा नियोजनाअभावी पशुपालक चिंताग्रस्त असतांना या पशुपालकांनी पुरवठा करण्यात आलेल्या बियाण्यांची लागवड केली. त्यामुळे भर उन्हाळ्यात या शेतकऱ्यांकडे मुबलक चारा उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावा आदर्श
जिल्ह्यात भीषण पाणी आणि ज्वारीचा पेरा हद्दपार झाल्याने चाराटंचाई निर्माण झाली आहे. अद्याप एकाही तालक्यात चाराछावणी नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी वैण बियाणे, ठोंबे लागवड करून चारा उत्पादन घेत चाराटंचाईवर यशस्वीरीत्या मात केल्याने इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.
दुभत्या जनावरांकरिता वैरण उपलब्ध करण्यासाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीला १ लाख ७५ हजारांचा निधी प्राप्त झाला. यातून वैरण बियाणे आणि ठोंबे खरेदी करीत पशुपालकांना पुरवठा करण्यात आले.
- डॉ. स्मिता मुडे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पं.स.समुद्रपूर.