राष्ट्रवादी काँगे्रसकडून आघाडी धर्माचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:26 PM2018-05-17T21:26:42+5:302018-05-17T21:26:42+5:30
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेच्या जागेवर काँग्रेस राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचे उमेदवार इंद्रकुमार बालमुकूंद सराफ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगणघाट नगर परिषदेचे गटनेते सौरभ तिमांडे यांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेच्या जागेवर काँग्रेस राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचे उमेदवार इंद्रकुमार बालमुकूंद सराफ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगणघाट नगर परिषदेचे गटनेते सौरभ तिमांडे यांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्या महादेवपुरा येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, राकाँचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार विधान परिषद निवडणूकीतून आपण माघार घेऊन काँग्रेस-राकाँ आघाडीच्या उमेदवाराला समर्थन देत असल्याचे सौरभ तिमांडे यांनी सांगितले. याबाबतची घोषणा बुधवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश देशमुख यांनी केली होती. त्यानंतर गुरूवारी याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी धर्माचे पालन करीत हा निर्णय घेतला आहे; पण काँग्रेसकडून अद्याप कुठलाही संवाद आपल्याशी झालेला नसल्याची माहितीही माजी आमदार राजू तिमांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सौरभ तिमांडे यांनी विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तीनही जिल्ह्यांमध्ये आपण प्रचार सुरू केला होता; पण राष्ट्रवादी काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना केल्यानंतर आपण सदर निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, वसंतराव कार्लेकर, प्रा. राजू तिमांडे, राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्यासह उमेदवार सौरभ तिमांडे उपस्थित होते.