वर्ध्यातील 'या' इन्फ्लूएन्सर्सचे फॉलोअर्स अन् कमाई लाखांत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 06:10 PM2024-08-28T18:10:25+5:302024-08-28T18:10:56+5:30
सोशल मीडियाची क्रेझ : प्रेरणादायी, मनोरंजनात्मक, प्रबोधनात्मक व्हिडीओ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येकच व्यक्ती याचा वापर करताना दिसून येतो. क्वचितच एखादा व्यक्ती वापर न करणारा आढळून येईल. नव्या पिढीतील तरुणांना तर सोशल मीडियाचे प्रचंड वेड लागले आहे. जिल्ह्यातील मोबाइल नेटवर्क, इंटरनेटची समस्या असतानाही सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर्सचे काम करून लाखो फॉलोअर्सचे मनोरंजन व त्यांना प्रेरणा देत आहेत.
वर्धा तालुक्यातील मांडवा येथील मूळ रहिवासी तसेच हल्ली वर्ध्यात राहणारे नितेश कराळे हे सोशल मीडियावर 'कराळे मास्तर किंवा खदखद मास्तर' म्हणून सर्वपरिचित आहेत. स्पर्धा परीक्षेच्या वर्गासोबतच सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असून, त्यांना महिन्याला एक लाख तर वर्षाला दहा ते बारा लाख रुपयांची कमाई या सोशल मीडियातून होत आहे. यासोबतच नव्याने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेला अजय मोहिते यानेही सध्या चांगलीच धूम केली आहेत. जीमसह फर्निचरच्या व्यवसायासोबतच एक आवड म्हणून व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर टाकत आहे. या दोघांचेही फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबवर व्हिडीओ आणि रील्स अपलोड केल्या जात असून, त्यांना लाईक आणि शेअर करणाऱ्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. अनेक युवक त्यांना फॉलो करीत आहे. यातून या दोघंच्या कमाईतही मोठी वाढ होत आहे.
नितेश कराळे, वर्धा
कोरोना काळात वन्हाडी बोलीत शिकवणीचे व्हिडीओ शेअर करण्यापासून सुरुवात झाल्यानंतर कराळे मास्तरला सोशल मीडियावर चांगलाच चाहता वर्ग मिळाला. देशातील चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, राजकीय परिस्थिती यावर वहाडी भाषेतील व्हिडीओ तयार करून ते सातत्याने शेअर केले जात असल्याने त्यांची फॉलोअर्स अन् कमाईसुद्धा वाढत आहे.
इंस्टाग्राम ३,५०,०००
फेसबुक ४,५०,०००
युट्युब - १०,००,०००
अजय मोहिते, वर्धा
अजय मोहिते याने आपल्या शरीरयष्टीचा पुरेपूर वापर करून व्हिडीओ आणि रील्स बनवायला सुरुवात केली आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून ते अॅक्टिव्ह असून ताज्या घडामोडीतून नागरिकांचे मनोरंजन करणे, हा त्याचा उद्देश आहे. पुष्पा चित्रपटासह इतर चित्रपटातील गाण्यावर नृत्य करण्याचे व्हिडीओ अनेकांना आवडल्याने त्याचे फॉलोअर्स वाढत आहेत. यातूनच आता हैदराबाद, मुंबई व दुबई सारख्या ठिकाणी प्रमोशनकरिता निमंत्रण येत आहे.
फेसबुक - ११,२५,०००
इंस्टाग्राम - १,४९,०००
नवीन इन्फ्लूएन्सर्सना सल्ला काय?
आपल्यातील कलांची जोपासणूक करून त्यातून दुसऱ्यांना आनंद देण्यासोबतच त्यांच्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. दुसऱ्याच्या व्हिडीओचे अनुकरण न करता स्वतःतील कलाकृतीचे प्रदर्शन करावे. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर लक्ष दिले की आपोआप फॉलोअर्स वाढत जातात आणि फॉलोअर्स वाढले की कमाईही वाढते; पण सामाजिक भान जोपासणे गरजेचे आहेत, असे मत दोघांनीही व्यक्त केले आहे.