शेतकऱ्यांसह कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:27 PM2018-11-19T22:27:07+5:302018-11-19T22:27:45+5:30
शेतकरी, कष्टकरी तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारच्या पं.स. सदस्या अरुणा सावरकर, प्रहारचे देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेश सावरकर व रसुलाबाद पं.स. सर्कलमधील काही सुजान नागरिकांनी सोमवार १९ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शेतकरी, कष्टकरी तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारच्या पं.स. सदस्या अरुणा सावरकर, प्रहारचे देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेश सावरकर व रसुलाबाद पं.स. सर्कलमधील काही सुजान नागरिकांनी सोमवार १९ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सदर मागण्या निकाली निघाव्या यासाठी संबंधितांना वेळोवेळी निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीच्या निषेधार्थ हे आंदोलन आर्वी पं.स. कार्यालयासमोर डेरा टाकून सुरू करण्यात आले आहे.
आर्वी पं.स.तील रसुलाबाद सर्कल मधील चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून पं.स. सदस्य अरुणा सावरकर यांनी यापूर्वी पं.स. सभागृहात सदर विषय मांडले. इतकेच नव्हे तर संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून सदर समस्या निकाली काढण्याची विनंती केली. परंतु, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या निवेदनांना केराची टोपलीच दाखविल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध करण्यासाठी तसेच तालुका प्रशासनाचे सदर मागण्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात पं.स. सदस्य अरुणा सावरकर, राजेश सावरकर यांच्या नेतृत्त्वात अजय भोयर, बिट्टू रावेकर व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.
आंदोलनकर्त्यांच्या मागण्या
रोजगार हमी योजनेतील अनुदानाचे तात्काळ वाटप करण्यात यावे.
रसुलाबाद येथील राजीव गांधी भवनचे काम मागील १० वर्षांपासून रखडले असून त्याला तात्काळ गती देण्यात यावी.
घरकुल मधील सावळ्या गोंधळाचा त्रास गरजुंना होत असून तो दूर करण्यासाठी योग्य पाऊल उचलावेत.
दिव्यांगांच्या वाट्याचा ३ टक्के निधी जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी खर्च केला नसून त्यांना तो खर्च करण्यासाठी लेखी सूचना देण्यात याव्या. दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ प्राधान्य क्रमाने देण्यात यावा.
कवठा मार्गाची दैनावस्था झाली असून या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात यावे. बाºहा हे गाव आदिवासी बहूल असून या गावात प्राथमिक सोयी-सूविधांचा अभाव आहे. या कावाचा विकास करण्यात यावा. कुठलाही गरजू शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून तालुक्यात सर्वेक्षण करण्यात यावे. मनमर्जीने काम करणाऱ्या टेंभरी येथील अंगणवाडी सेविकेवर चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी.