अन्न सुरक्षा सैन्य तयार करावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:23 PM2018-03-11T22:23:53+5:302018-03-11T22:23:53+5:30

जगाच्या बाजारात जे विकू शकतो, ते पिकवलं तर भारताचा शेतकरी जगाचा बाजार काबीज करू शकतो. त्यासाठी शेतीतील रासायनिक खतांचा वारेमाप वापर सोडून सेंद्रीय आणि शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज आहे.

Food security forces have to be created | अन्न सुरक्षा सैन्य तयार करावे लागेल

अन्न सुरक्षा सैन्य तयार करावे लागेल

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : कृषी कार्यालयासाठी दोन कोटींची घोषणा

ऑनलाईन लोकमत
वर्धा : जगाच्या बाजारात जे विकू शकतो, ते पिकवलं तर भारताचा शेतकरी जगाचा बाजार काबीज करू शकतो. त्यासाठी शेतीतील रासायनिक खतांचा वारेमाप वापर सोडून सेंद्रीय आणि शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रातील समस्यांचा गोवर्धन सर्वांनी मिळून उचलून देशात अन्न सुरक्षा सैन्य निर्माण करण्यासाठी वर्धा व चंद्रपूर हे जिल्हे कृषी क्षेत्राच्या दृष्टीने मॉडेल जिल्हे करण्याचा संकल्प अर्थमंत्री व जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
जिल्हा कृषी प्रदर्शन व वºहाडी खाद्य महोत्सवाचा प्रारंभ वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते शेतकºयांना संबोधित करीत होते. कार्यक्रमाला खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नगराध्यक्ष अतुल तराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, माजी आमदार दादाराव केचे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने आदी उपस्थित होते.
शाश्वत शेतीचा विचार २०१४ च्या अर्थसंकल्पात मांडला होता, हे सांगताना मुनगंटीवार पूढे म्हणाले की, या विचाराला धरून राज्य शासनाने जलयुक्त शिवार, शेततळे, विहिरी, वीज पंप जोडणी यासाठी भरघोस निधी दिला. महाराष्ट्रातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. याचा विचार करून शासनाने जलयुक्त शिवारसारखी महत्वाकांक्षी योजना राबविली. शेतीत रासायनिक खतांचा उपयोग झाल्याने शेतीची उत्पादकता कमी झाली. यामुळे मित्रकिड संपली आणि शेतीचा खर्च प्रचंड वाढला. परिणामी, आपला शेतमाल विषयुक्त होऊन जगाच्या बाजारातून माघारी येऊ लागला. मातीवरचा हा अत्याचार थांबविण्याची गरज असून शासन विषमुक्त शेती व पथदर्शी प्रकल्प राबविणार आहे. वर्धा जिल्हा कृषी कार्यालयाच्या इमारतीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दोन कोटी रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा त्यांनी केली. शेतकºयांना या कार्यालयात मनापासून यावसं वाटेल, अशी कार्यालयाची रचना करावी, असेही त्यांनी सांगितले.
शेती व संलग्नित विभागाच्या योजनांचे एकत्रिकरण केलेल्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. मदनी गावातील जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांचा परिणाम दाखविणारे छायाचित्र आ.डॉ. भोयर यांनी पाकलमंत्र्यांना भेट दिले. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. तडस यांनी आभार मानले. आ.डॉ. भोयर यांनी समाधान शिबिराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने उत्तम काम केले असून शिबिरात १० हजार शेतकºयांची जमीन वर्ग २ मधून १ मध्ये रूपांतरीत केल्याचे सांगितले. जिल्हा कृषी कार्यालयाला नवीन इमारत उपलब्ध करून देण्याची विनंती केली. पालकमंत्र्यांनी कृषी महोत्सवाचे फीत कापून उद्घाटन केले व स्टॉलची पाहणी केली. प्रास्ताविक ज्ञानेश्वर भारती यांनी, संचालन सचिन घोडे यांनी केले तर आभार उपसंचालक कापसे यांनी मानले.
निर्णयाची फलश्रुती
शेतकºयांपर्यंत नवीन तंत्रज्ञान, बी-बियाणे व कृषी क्षेत्रातील आदर्श प्रकल्पाचे आदानप्रदान होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय मागील अर्थसंकल्पात जाहीर केला होता. यावर्षी त्याची फलश्रूती झाली. शेतकºयांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा. या अर्थसंकल्पात शेतीशी निगडीत १५,९०९ कोटी अर्थसंकल्पीत केले, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
ग्रंथालयाचा उपयोग वाचन संस्कृतीच्या विस्तारासाठी व्हावा
‘आम्ही वर्धेकर’ सांस्कृतिक संघटनेकडून पालकमंत्र्यांचा सत्कार
ग्रंथालय हे माणुसकीचं चालतं बोलतं ज्ञान देणार विद्यापीठ आहे. १९९५ मध्ये विधानसभेवर प्रथम निवडून गेलो त्यावेळीच प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज ग्रंथालय निर्माण करण्याचा संकल्प केला होता. आज अशा ग्रंथालयाचे लोकार्पण करताना आनंद वाटतो. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा उपयोग वाचन संस्कृतीचा विस्तार करण्यासह ज्ञानार्जनासाठी करावा, असे अर्थ व नियोजन मंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
जिल्हा ग्रंथालयाच्या सुसज्ज इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक सभागृहाकरिता शासन निर्णय काढल्याबद्दल आम्ही वर्धेकर सामाजिक व सांस्कृतिक संघटनेतर्फे पालकमंत्र्यांचा जाहीर ऋणनिर्देश सत्कार करण्यात आला
पालकमंत्री पूढे म्हणाले की, महाराष्ट्र व विदर्भातील मुलांचे केंद्र शासनाच्या नोकºया मिळविण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी यावर्षी प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करण्यासाठी ५० कोटींची तरतूद केली. प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज नाट्यगृह मंजूर केले. विदर्भातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास तो जगात कुणाशीही स्पर्धा करू शकतो. वर्धेचे नाट्यगृह पाहताना लोक महात्मा गांधींचे विचारही घेऊन जातील. यामुळे नाट्यगृहाचे काम एक वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करून दर्जेदार काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. आरोग्य, शिक्षण या दोन गोष्टी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावे म्हणून जिल्हा वार्षिक योजनेत यंदा अधिक निधी दिला. आष्टी शहीद स्मारकासाठी निधी देताना स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेल्या शुरांसाठी निधी दिला. यात राजकारण मधे आणले नाही, असे सांगत विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले.
विकास ‘कोमात’ ठेवणारे म्हणून नाव निघू नये
मी अशा पक्षाचा कार्यकर्ता आहे, जेथे किती वर्षे सत्तेत होतो, हे नव्हे तर लोकांना आठवण देत किती कामे करू शकलो, हे महत्त्वाचे आहे. आतापर्यंत राज्यात ४७६ मंत्री झाले; पण नावे विचारल्यास २५ नावेही नागरिकांना घेता येणार नाही. यामुळे नाव निघेल तेव्हा काम करणारे म्हणून निघावे. २५ वर्षे विकास कोमात ठेवणारे म्हणून निघू नये, असा प्रयत्न असल्याचे सांगत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विरोधकांना टोला लगावला.
कामांना गती देण्याच्या सूचना द्या - भोयर
वर्धा जिल्ह्याला केंद्र्र व राज्य शासन मोठ्या प्रमाणात निधी देत आहे. त्या अनुषंगाने शहर परिसरात विकास कामे होत आहे; पण काही कामे संथगतीने होत असून ती सहा महिन्यांत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात याव्या, अशी मागणी आ.डॉ. भोयर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.

Web Title: Food security forces have to be created

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.