जिल्ह्यात फुटबॉल फिवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:20 PM2017-09-15T23:20:08+5:302017-09-15T23:20:39+5:30
महाराष्ट्र मिशन फुटबॉल १ मिलियन या अभियानात वर्धेत शुक्रवारी सर्वत्र फुटबॉल फिवर चढल्याचे दिसून आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र मिशन फुटबॉल १ मिलियन या अभियानात वर्धेत शुक्रवारी सर्वत्र फुटबॉल फिवर चढल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थी आज फुटबॉल खेळताना दिसून आले. या अभियानाचा शुभारंभ वर्धेतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते झाला.
शासनाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत या अभियानांतर्गत फुटबॉल खेळावयाचा होता. याकरिता एकूण ४०९ शाळांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या प्रत्येक शाळेला तीन असा एकूण १ हजार २२७ फुटबॉलचा पुरवठा करायचा होता. त्याचे नियोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले; मात्र नियोजनात गडबड झाल्याने ग्रामीण भागातील शाळांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या फुटबॉलचा वापर करून अभियानात सहभाग नोंदविला.
या अभियानाकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा संकुल तसेच फुटबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र मिशन फुटबॉल १ मिलियन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर होते. यावेळी महाराष्ट्र शासनाचा जिजामाता व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या डॉ. नंदिनी बोंगाडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
यावेळी विविध शाळा, महाविद्यालये, जिल्हास्तर क्रीडा संघटना, फुटबॉल संघटना, डॉक्टर्स संघटना, लॉयन्स क्लब, युवक व महिला मंडळे, क्रीडा मंडळे तसेच विविध वयोगटातील फुटबॉल प्रेमी पुरूष, महिला व खेळाडुंनी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी स्टेडीयमवरील सर्वांनाच फुटबॉल खेळण्याचा मोह आवरला नाही व यामुळे स्टेडीयम मैदानावर फुटबॉल फेस्टिवलचे स्वरूप प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, तालुका क्रीडा संकुलातही स्पर्धा झाल्या.
कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा अधिकारी चारूदत्त नाकट, रवींद्र काकडे, विजय डोबाळे, दर्शना पंडित, चैताली राऊत, डॉ. चौधरी, हेमंत वडस्कर, क्रीडा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तसेच अब्दुल सईद, फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी व रामकृष्ण रहाटे, एहेतेशाम शेख, विजय बिसने आदींनी केले.
ग्रामीण भागातील शाळांत फुटबॉल पोहोचले नाही
शासनाच्या या अभियानात जिल्ह्यात निवड झालेल्या प्रत्येक शाळेत फुटबॉल पोहाचविण्यात येणार होते. मात्र कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत या शाळांत फुटबॉल पोहोचले नाही. यामुळे शासनाच्या या अभियानाला येथे खो दिल्याचे दिसून आले आहे. शाळांत राबविण्यात आलेल्या या अभियानात सहभागी होण्याकरिता शाळांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्याच्या आधारावरच हे अभियान राबविण्यात आले.
४०९ पैकी किती शाळेत मैदान ?
मिशन फुटबॉल १ मिलियन या अभियानात एकूण ४०९ शाळांचा समावेश करण्यात आला. यापैकी किती शाळेत फुटबॉल खेळण्याकरिता मैदान आहे अथवा नाही याचा कुठलाही विचार करण्यात आला नाही. फुटबॉल खेळण्याकरिता मैदान आवश्यक असताना केवळ २० बाय ३० मिटर जागा आणि दोन खांब एवढी जागा उपलब्ध असल्यास फुटबॉल खेळणे शक्य असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकाºयांकडून सांगण्यात आले आहे.