कारसह विदेशी दारुसाठा जप्त
By admin | Published: June 12, 2017 01:49 AM2017-06-12T01:49:24+5:302017-06-12T01:49:24+5:30
गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत कारसह विदेशी दारूसाठा असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल : २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत कारसह विदेशी दारूसाठा असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई खडकी शिवारात शनिवारी रात्री उशीरा करण्यात आली. सदर प्रकरणी दोन जणांविरुद्ध सिंदी (रेल्वे) पोलिसात दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथून एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाद्वारे वर्धा शहरात विदेशी दारूसाठा आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी खडकी येथे सापळा रचून एम. एच. ३१ झेड. ९९५९ क्रमांकाची कार अडवून पाहणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी सदर कारसह वाहनातील विदेशी दारू असा एकूण २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाईदरम्यान दारूची वाहूक करणाऱ्या योगेश मदनलाल विश्वकर्मा (२४) रा. समतानगर वर्धा, सुमीत उर्फ लादेन राजेश चंदनखेडे (२०) रा. बुरांडे ले-आऊट, आर्वी नाका, वर्धा यांचे विरूद्ध सिंदी रेल्वे पोलिसात गुन्हे दाखल केले. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे उदयसिंग बारवाल, अमर लाखे, अनंद भस्मे, दिवाकर परिमल, चंद्रकांत जीवतोडे यांनी केली.