वनविभागाचे अधिकारी पोहोचले बाभूळबनात
By admin | Published: January 25, 2017 12:54 AM2017-01-25T00:54:28+5:302017-01-25T00:54:28+5:30
हिंगणी वन परिक्षेत्रातील सुरगाव नजीकच्या नागटेकडी शिवारात बाभुळबनाचा चोरट्यांनी सफाई केली
संशयित ताब्यात : बुंध्याचे मोजमाप व हॅमरिंग, घटनास्थळावर केवळ ट्रकभर लाकडे
आकोली : हिंगणी वन परिक्षेत्रातील सुरगाव नजीकच्या नागटेकडी शिवारात बाभुळबनाचा चोरट्यांनी सफाई केली. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच झडशीचे क्षेत्र सहाय्यक जी.एस. कावळे, सेलूच्या क्षेत्र सहाय्यक ए.टी. लटपटे, वनरक्षक सी.पी. नागरगोजे, बी.पी. पर्वत व विनायक गाऊत्रे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे तपास करीत आहेत.
नागटेकडी भागातील बाभुळबनात गत दोन महिन्यांपासून बाभळीच्या झाडांची कत्तल सुरू होती. वन व महसूल विभागाच्या सर्व्हे क्र. १५, १६ व १७ मध्ये बाभळीची मोठी झाडे होती. ही झाडे कटर व आराच्या साह्याने कापून लागलीच ट्रकमध्ये भरून वाहतूक केली जात होती. याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली आणि चोरट्यांचे बिंग फुटले. सदर प्रकरणी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाभूळबनात दाखल होत कापलेल्या झाडांचे मोजमाप, बुंध्याचे मोजमाप करून हातोडा मारण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे यांनी आरोपींची शोधमोहीम राबवून संशयित म्हणून संदीप रामकृष्ण सहारे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याशिवाय इतर सकाऱ्यांनी कोणत्या वाहनाने लाकडाची वाहतूक केली, या बाबींचा उलगडा होणार नाही. आता या प्रकरणात वन विभागाचे अधिकारी कोणत्या दिशेने तपास करतात, दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लाकूड चोरीतील चोरटे वन विभागाच्या गळ्याला लागणार की नाही, त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)
संशयित आरोपी करीत होता शेतकऱ्यांना दमदाटी
या प्रकरणातील संशयित आरोपी हा शेतकऱ्यांना दमटाती करीत होता. एकाला मारहाणसुद्धा केली होती. घटनास्थळावर गेलेल्या गावातील दोघांना सोमवारी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे यातील एकाने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. वन विभाग व महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे दोन नंबरच्या पैशातून दादागिरी फोफावत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळते.