पवनारसह येळाकेळीला येणार छावणीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:18 PM2017-09-01T23:18:03+5:302017-09-01T23:18:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बाप्पाच्या विसर्जनासाठी नजीकच्या येळाकेळी व पवनार येथे गणेश भक्त एकच गर्दी करतात. विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदर दोन्ही गावांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा अंतिम आराखडा पोलीस प्रशासनाकडून तयार करण्यात आला असून पोलीस बंदोबस्तामुळे पवनार व येळाकेळी येथील धाम नदीपात्राला पोलीस छावणीचे स्वरूप येणार आहे. यंदा दोन्ही ठिकाणच्या बंदोबस्तासाठी एकूण १०० गृहरक्षक दलाच्या जवानांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
वर्धा-आर्वी मार्गावरील येळाकेळी व वर्धा-नागपूर महामार्गावरील पवनार येथे वर्धा शहरासह परिसरातील नागरिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी जातात. विसर्जन सोहळ्याच्या दोन दिवसात सदर दोन्ही गावांमध्ये गणरायाच्या भक्तांचा मळाच फुलतो. या उत्सवादरम्यान वर्धा-नागपूर व वर्धा-आर्वी मार्गावरील वाहतूक खोळंबू नये म्हणून सेवाग्राम व सावंगी (मेघे) पोलिसांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे.
पवनार येथे अनुचित घटना टाळण्यासाठी यंदा सेवाग्राम पोलीस पाच जलतरणपट्टू, ४० पुरुष गृहरक्षक व १५ महिला गृहरक्षक तसेच पोलीस मित्रांचे सहकार्य घेणार आहेत. यंदा पवनार येथील बंदोबस्ताकरिता जिल्हा पोलीस प्रशासनाने सेवाग्राम पोलिसांना दोन दिवसांसाठी अतिरिक्त ४ पोलीस अधिकारी, ३५ कर्मचारी, सात महिला पोलीस कर्मचारी दिलेले आहेत. तर येळाकेळी येथील बंदोबस्ताकरिता सावंगी पोलिसांना अतिरिक्त ३५ पुरुष गृहरक्षक, १० महिला गृहरक्षक, १३ पोलीस कर्मचारी व ३ महिला पोलीस कर्मचारी दिले आहेत. याशिवाय दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दोन्ही ठिकाणी विसर्जन उत्सवादरम्यान अनुचित घटना टाळण्यासाठी दोन दिवस खडा पहाराच देणार असल्याचे सांगण्यात आले.
यंदाही भाविकांना नदीपात्रात प्रवेश नाहीच
पवनार येथे मूर्ती विसर्जनासाठी भाविक एकच गर्दी करतात. या उत्सवादरम्यान अनुचित घटना टाळण्यासाठी नेमूण दिलेल्या व्यक्तीशिवाय कुणालाही मूर्ती विसर्जनासाठी नदी पात्रात उतरता येणार नसल्याचे निश्चित करण्यात आले आहे. विसर्जनासाठी नदी पात्र परिसरात युवा ब्रिगेटचे कार्यकर्ते, स्थानिक भोई समाज बांधव व सुमारे १५ पोलीस मित्रांचे सहकार्य घेण्यात येणार आहेत. त्यांच्याच सहकार्याने भाविकांनी मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहनही सेवाग्राम पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
च्पवनार व येळाकेळी येथे अस्थायी पोलीस चौकी तयार करून तेथून वेळोवेळी भाविकांसह नागरिकांना आवश्यक सूचना पोलिसांच्यावतीने करण्यात येणार आहे. यात निर्माल्य नदीत न टाकणे तसेच नदीच्या पाण्याची कुठल्याही भाविकाने जाऊ नये अशा सुचनांचा समावेश आहे.
पवनार येथे विसर्जन उत्सवादरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून आपण १० वाहतूक पोलीस कर्मचाºयांची मागणी केली आहे. वाहतूक प्रभावीत होऊ नये म्हणून नागपूरकडून वर्धेच्या दिशेने व वर्धेकडून नागपूरच्या दिशेने जाणारे वाहने पवनारच्या मोठ्या पुलावरून ये-जा करणार आहेत. तर मूर्ती विसर्जनाकरिता येणाºयासाठी छोट्या पुलावरून व्यवस्था करण्यात आली आहे.
- आर. व्ही. मेंढे, ठाणेदार,पो.स्टे. सेवाग्राम.
येळाकेळी येथील धाम नदी पात्रात मूर्ती विसर्जनासाठी सुमारे ३५ पोलीस मित्रांचे सहकार्य घेतले जाणार आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी त्यांच्याशिवाय कुणालाही नदीपात्रात उतरता येणार नाही. पोलीस मित्र मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना सहकार्य करणार आहेत.
- संतोष शेगावकर, ठाणेदार, पो.स्टे. सावंगी (मेघे)
घरगुती नंदीघाटावर तर सार्वजनिक गणपतीचे विसर्जन छत्रीघाटावर
पवनार येथे विसर्जनासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याने धाम नदी पात्राला पोलीस छावणीचे स्वरूप येणार आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही घरगुती गणपतीचे विसर्जन नंदी घाटावर तर सार्वजनिक गणपतीचे विसर्जन छत्रीघाटावर होणार असल्याचे सांगण्यात आले.
निर्माल्यासाठी वेगळी व्यवस्था
नदी प्रदूषित होऊ नये म्हणून पवनार व येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्र परिसरात निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या निर्माल्यकुंडात भाविकांनी निर्माल्य टाकावे, असे आवाहन काही सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रा.पं. प्रशासन करणार आहे.
वाहतूक खोळंबणार नाही याची घेणार दक्षता
विसर्जन उत्सवादरम्यान पवनार येथे वर्धा-नागपूर महामार्गावरील वाहतूक प्रत्येक वर्षी खोळंबत असल्याचे वास्तव आहे. यंदा कुठल्याही परिस्थितीत या मार्गावरील वाहतूक खोळंबणार नाही याची दक्षता सेवाग्राम पोलीस घेणार आहेत.
५२ सार्वजनिक तर १,५९२ घरगुतीचे बाप्पाचे विसर्जन
वर्धा शहर, सावंगी (मेघे), रामनगर व सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एकूण ५२ सार्वजनिक तर १ हजार ५९२ घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन नजीकच्या पवनार व येळाकेळी येथील धाम नदी पात्रात होणार आहे.