रेल्वे प्रवाशांना गंडा घालणारे तोतया पोलीस जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 06:49 PM2018-06-25T18:49:03+5:302018-06-25T18:50:23+5:30
धावत्या रेल्वेत प्रवाशांना पोलीस असल्याची बतावणी करून गंडा घालणाºया टोळीतील दोन चोरट्यांना वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जेरबंद केले
वर्धा - धावत्या रेल्वेत प्रवाशांना पोलीस असल्याची बतावणी करून गंडा घालणाºया टोळीतील दोन चोरट्यांना वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून एक मोबाईलसह रोख ४ हजार ३०० रुपये जप्त करण्यात आले आहे. सागरसिंह वीरसिंह भोंड (२२) व कमलसिंह बीरसिंह भोंड (२०) रा. बल्लारशाह, असे अटकेतील आरोपींची नावे असल्याचे सांगण्यात आले.
चन्नई-अमदाबाद नवजीवन एक्स्प्रेसने छत्तीसगढ राज्यातील टोला जिल्ह्यातील पुरुषोत्तम देवसिंह तारम (३२), तरुणकुमार जोहरालाल आमिले (३१) व जितेंद्रकुमार जवाहरलाल उमाले हे प्रवास करीत होते. दरम्यान चार व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगून त्यांच्या साहित्याची पाहणी केली. परंतु, साहित्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी सदर तीनही व्यक्तींकडे असलेली एकूण रोख १३ हजार ६१० रुपये आपल्याकडे ठेवून घेत घटनास्थळावरून पोबारा केला. काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना दिली. माहिती मिळताच व तक्रारकर्त्यांनी सांगितलेल्या संशयीत आरोपींच्या वर्णनावरून धावत्या रेल्वेतच आरोपींना ताब्यात घेण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान तक्रारकर्त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून सागरसिंह भोंड व कमलसिंह भोंड यांना ताब्यात घेण्यात आले. शहानिशा केल्यानंतर प्रवाशांना गंडा घालणारे हेच ते तोतया पोलिसांच्या टोळीतील सदस्य असल्याचे पुढे आले. त्याच्या जवळून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी एक मोबाईल व रोख ४ हजार ३०० रुपये जप्त केले आहे. तर टोळीतील दोन सदस्यांनी यशस्वी पळ काढला. त्यांचा शोध सध्या घेतल्या जात आहे. सदर दोन्ही आरोपींविरुद्ध वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नागपूरचे वरिष्ठ सुरक्षा मंडळ आयुक्त ज्योतीकुमार सतीजा, वर्धा रेल्वे सुरक्षा बलचे ठाणेदार सुरेश कांबळे, उपनिरीक्षक अश्विनीकुमार बारले यांच्या मार्गदर्शनात ए.एस.आय. सुरेश अस्वले, अतुल सावंत, विकास बोरवार यांनी केली.