कारंजात पाणी समस्या तीव्र; गोपालक सोडताहेत गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:37 PM2019-05-11T23:37:51+5:302019-05-11T23:38:17+5:30
तालुक्यात पाणी व चारा समस्या तीव्र झाली आहे. मात्र शासनस्तरावर केल्या जात असलेल्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याने गोपालक गाव सोडून जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : तालुक्यात पाणी व चारा समस्या तीव्र झाली आहे. मात्र शासनस्तरावर केल्या जात असलेल्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याने गोपालक गाव सोडून जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
संपूर्ण तालुक्यात एकही शासकीय टँकर सुरू नसून १७ गावांमध्ये विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित केल्या आहेत. मात्र, अधिग्रहण केलेल्या विहिरी आणि बोअरवेलचे पाणी अपुरेच आहे. त्यामुळे पाणी पेटल्याचीच स्थिती आहे. आचारसंहितेमुळे ग्रा.पं. ला टँकर सुरू करण्यासाठी ठराव घेता येत नाही. यामुळे शासकीय अधिकारीदेखील निद्रिस्त आहेत. टंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणीदेखील ते करायला तयार नाहीत. तालुक्यातील चोपण, ब्राह्मणवाडा, गारपीट, धामकुंड, सेलगाव (उमाटे) येथील कित्येक गोपालक गाव सोडून गेले असून अनेक गोपालक पाणी व चाऱ्याच्या समस्येमुळे गाव सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात एकमेव खैरी धरण कोरडे पडले असून केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
धरणाशेजारील गावांंमध्ये पाण्याचा प्रचंड अपव्यय होत आहे. मात्र कुणाचेही लक्ष नाही. कारंजा शहरामध्येसुद्धा सहा ते सात दिवसानंतर नळ येत आहेत. खासगी टँकरचे भाडे देणे सर्वसामान्य जनतेला झपावणारे नाही. शहरातील सार्वजनिक नळावर रात्रीच्या वेळेस अनेक पाईप पडलेले असतात. यातून कित्येक लिटर पाणी वाया जात आहे.
अनेकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने ते कुटुंबाला नातेवाईकांकडे सोडून एकटे राहणे पसंत करीत आहेत. चारा डेपोअभावी चारा गंभीर समस्या बनली आहे. याविषयी तहसीलदार सचिन कुमावत यांनी सांगितले की, खैरी डॅममध्ये जूनपर्यंत पुरेल एवढा १८ ते २० टक्के जलसाठा साठवून ठेवला असून शासनाने विदर्भात चारा डेपो सुरू केलेले नाहीत.
टँकर सुरू करण्याबाबत निर्देश पंचायत समितीकडून आलेले नाहीत. पाणी समस्येवर मात करण्याकरिता आॅक्टोबर महिन्यापासून सुरूवात करायला पाहिजे. पाणी समस्येकडे पूर्णपणे लक्ष ठेवून आहे, असे सांगितले.