कड्याळूच्या मुळ्या खाल्ल्याने चार गाई दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:16 PM2019-05-13T22:16:17+5:302019-05-13T22:16:46+5:30
कड्याळू चाऱ्याच्या मुळ्या खाल्ल्याने चार गार्इंचा मृत्यू झाला. तर दहा गार्इंची प्रकृती खालावल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे विरुळ (आकाजी) परिसरात एकच खळबळ उडाली असून नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे. प्रकृती गंभीर असलेल्या जनावरांवर उपचार सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : कड्याळू चाऱ्याच्या मुळ्या खाल्ल्याने चार गार्इंचा मृत्यू झाला. तर दहा गार्इंची प्रकृती खालावल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे विरुळ (आकाजी) परिसरात एकच खळबळ उडाली असून नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे. प्रकृती गंभीर असलेल्या जनावरांवर उपचार सुरू आहे.
सध्या या भागातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे हा प्रसंग पशुपालकांवर ओढवला आहे. अशातच चारा टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असलेल्या गावातील पशुपालकांच्या गाई जंगलात चरण्यासाठी नेण्यात आल्या होत्या. दरम्यान, या गार्इंनी कढाऊ पिकाच्या मुळ्या खाल्ल्या. यातच त्यांना विषबाधा होत त्यांची प्रकृती खालावण्यास सुरूवात झाली. यात चार गार्इंचा तडफडून मृत्यू झाला तर इतर जनावरांची प्रकृती खालावल्याने जनावरांना विषबाधा झाल्याचे पशुपालकांच्या निदर्शनास आले. तातडीने पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पराते यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठून प्रकृती खालावलेल्या जनावरांवर उपचार सुरू केला. त्यांच्या प्रयत्नामुळे सहा गार्इंचे प्राण बचावले. तर सहा गार्इंची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सुनील सालंकार यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत जनावरांसाठी घटनास्थळीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टँकरच्या माध्यमातून केली होती.
ज्वारीचे मूळ खाणे बेतले जीवावर
खरांगणा (मो.) - परिसरातील पशुपालकांना वैरण टंचाईच्या झळा सध्या सहन कराव्या लागत आहे. याच पार्श्वभूमीवर चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांनी ज्वारीचे मूळ खाल्ल्याने पाच गार्इंचा मृत्यू झाला. तर १५ गार्इंची प्रकृती खालविली. ही घटना नजीकच्या दहेगाव (गोंडी) शेत शिवारात घडली. या घटनेमुळे पशुपालक राजाभाऊ देशमुख यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, दहेगाव (गोंडी) येथील राजाभाऊ देशमुख यांच्याकडे एकूण २० गाई आहेत. सोमवारी त्यांच्याकडे कामावर असलेल्या गड्याने सदर जनावरे जंगलाच्या दिशेने चारण्यासाठी नेली. दरम्यान, जनावरांनी शेत शिवारात असलेल्या ज्वारी पिकाच्या मुळ्या खाल्ल्या. काही वेळानंतर जनावरांची प्रकृती खालावण्यास सुरूवात झाल्याने त्याने घटनेची माहिती तातडीने राजाभाऊ देशमुख यांना दिली. त्यांनी तातडीने दहेगाव (गोंडी) येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाºयांनी घटनास्थळ गाठून प्रकृती खालावलेल्या जनावरांची पाहणी केली असता पाच जनावरे दगावल्याचे निदर्शनास आले. तर उर्वरित १५ जनावरांना औषधोपचार सुरू केला. या घटनेमुळे पशुपालक राजाभाऊ देशमुख यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.