अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्तांसाठी चार कोटी
By admin | Published: June 4, 2015 01:50 AM2015-06-04T01:50:52+5:302015-06-04T01:50:52+5:30
यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
आशुतोष सलील : खरिपातील बाधित शेतकऱ्यांना ८८ कोटींचे वाटप, वंचितांनाही मदत
वर्धा : यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ४ कोटी ७ लाख ७७ हजार २५० रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पैकी १ कोटी ६९ लाख २६ हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे, उर्वरित निधीचे वाटप सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खरीप हंगाम २०१४ मधील बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाकडून १०७ कोटी ५३ लाख रुपये अनुदानाच्या रूपात जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. सदर अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करायचे होते. ज्यांचे खाते उपलब्ध झाले अशा शेतकऱ्यांना ८८ कोटी ५९ लाख ८६ हजार ७८१ रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले. मात्र काही शेतकऱ्यांचे बँक खाते प्राप्त न झाल्यामुळे १८ कोटी ४८ लाख ८३ हजार ४११ रुपयांचा निधी शासनाला समर्पित करण्यात आला. यात काही शेतकरी या मदतीपासून वंचित राहिल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. वंचित शेतकऱ्यांची माहिती घेतली असता पुन्हा ७ कोटी ३८ लाख २४ हजार ५२४ रुपयांची गरज जिल्हा प्रशासनाला आहे. या निधीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा निधी उपलब्ध होताच उर्वरित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी सलील यांनी यावेळी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)
प्रशासनात सुसूत्रता आणणार
जिल्हाधिकारी पदाचा प्रभार घेऊन जेमतेम दोन दिवस झाल्यामुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती घेणे सुरू आहे. प्रशासनात सुसुत्रतता आणण्याचा पूरेपूर प्रयत्न असेल.
‘जलयुक्त शिवार’वर स्वत: नियंत्रण ठेवणार
जलयुक्त शिवार अभियानाची कामे ३० जूनपर्यंत पूर्णत्वास न्यावयाची आहे. या अनुषंगाने काही अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी देण्यात आली असून त्यावर नियंत्रण स्वत: ठेवणार आहे.
शेतकऱ्यांना कर्ज वाटपाची गती वाढवणार
चालू महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ३० ते ३२ टक्केच शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप झालेले आहेत. ते ५० टक्क्यांवर असणे अपेक्षित होते. यापुढे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येईल. तसेच कर्ज वाटपाची गती वाढविण्यात येईल, अशी ग्वाहीही जिल्हाधिकारी सलील यांनी यावेळी दिली.