मानकापूर येथे वीज पडून चौघे जखमी; उपचारार्थ रुग्णालयात दाखल
By महेश सायखेडे | Updated: March 13, 2023 18:13 IST2023-03-13T18:12:47+5:302023-03-13T18:13:40+5:30
दुपारी ४ वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होत विजांचा कडकडाट सुरू झाला

मानकापूर येथे वीज पडून चौघे जखमी; उपचारार्थ रुग्णालयात दाखल
वर्धा : वीज पडून चौघे जखमी झाले. ही घटना हिंगणघाट तालुक्यातील मानकापूर शेत शिवारात सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मानकापूर शेत शिवारात आठ व्यक्ती शेतातील कामे करीत होते. दुपारी ४ वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होत विजांचा कडकडाट सुरू झाला. अशातच वीज पडून चौघे जखमी झाले. तर चौघांना किरकोळ दुखापत झाली. जखमींत दिनेश इवनठरे, सुनील अवतरे, मुरलीधर राऊत व गौरव पुरके यांचा समावेश आहे.
वीज पडून चौघांना गंभीर दुखापत झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत वडनेर पोलिसांना माहिती देऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती या चारही जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात रेफर केले. तर किरकोळ जखमींना तपासणीअंती रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी
वीज पडून चौघे जखमी झाल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून नागरिकांची गर्दी बाजूला सारत घटने बाबतची अधिकची माहिती जाणून घेतली.