चार अट्टल चोरटे केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:54 AM2017-09-22T00:54:49+5:302017-09-22T00:56:23+5:30
जिल्ह्यात चोºयांचे सत्र सुरू असतानाच सावंगी पोलिसांनी सापळा रचून चार अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या. अटकेतील आरोपीमध्ये एका दुचाकी चोरट्याचा तर तीन बकरी चोरांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात चोºयांचे सत्र सुरू असतानाच सावंगी पोलिसांनी सापळा रचून चार अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या. अटकेतील आरोपीमध्ये एका दुचाकी चोरट्याचा तर तीन बकरी चोरांचा समावेश आहे. दुचाकी चोरट्यांकडून पाच दुचाकी तर बकरी चोरांकडून कार, मोबाईल व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सय्यद कौंसर सय्यद असरब (२४), मोहम्मद अजहर मोहम्मद अकील (२०), मोहम्मद इरफान मोहम्मद जावेद (१९) सर्व रा. नागपूर असे बकरी चोरांची तर सुमित निरंजन भगत (२६) रा. नांदा जि. यवतमाळ असे दुचाकी चोरट्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुमीत भगत याला गोपनीय माहितीच्या आधारे सावंगी पोलिसांनी यवतमाळ येथून अटक केली. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. प्रारंभीला उडवाउडवीची उत्तरे देणाºया चोरट्याला पोलिसी हिसका मिळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जप्त केलेल्या पाच दुचाकींपैकी दोन दुचाकी त्याने सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लंपास केल्या तर तळेगाव, वर्धा शहर व कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली आहे. सावंगी पोलिसांच्या ताब्यात असलेला चोरटा सुमित भगत याला यापुर्वीही अटक केली होती. सावंगी पोलिसात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात त्याला एक वर्षाच्या सक्षम कारावासाची शिक्षाही झाली आहे. शिक्षा भोगल्यानंतर बाहेर आलेल्या चोरट्याने पुन्हा चोरीचे सत्र कायम ठेवल्याचे व त्याच्याकडे काही चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या सुमितवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे सुमारे १२ गुन्हे दाखल आहेत.
दुसरी कारवाई सावंगी पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री सालोड-दहेगाव (मि.) मार्गावर केली. संशयास्पद हालचाली करीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत विचारणा केली असता तिघेही बकºया चोरी करणारे चोरटे असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक कागदपत्र नसलेली एमएच ३१ एच ३४९६ क्रमांकाची कार, मोबाईल व इतर साहित्य जप्त केले. तीनही आरोपींनी सिंदी, सेलू व सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे ३० बकºया चोरून त्यांची नागपूर येथील एका मांस विक्रेत्याला विक्री केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडीले यांच्या मार्गदर्शनात सावंगीचे ठाणेदार संतोष शेगावकर, पोलीस उपनिरीक्षक पारडकर, रामदास बिसने, प्रदीप राऊत, संघसेन कांबळे, विलास अवचट, मुंडे यांनी केली.