वर्ध्यातील चार बेपत्ता अल्पवयीन मुले सापडली ओडिशात; मसाळा गावातील घटनेने उडाली होती खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2022 02:54 PM2022-09-26T14:54:11+5:302022-09-26T14:57:12+5:30

वर्धा पोलिसांची यशस्वी कामगिरी : मसाळा गावातील घटनेने उडाली होती खळबळ

Four missing minors from Wardha found in Odisha | वर्ध्यातील चार बेपत्ता अल्पवयीन मुले सापडली ओडिशात; मसाळा गावातील घटनेने उडाली होती खळबळ

वर्ध्यातील चार बेपत्ता अल्पवयीन मुले सापडली ओडिशात; मसाळा गावातील घटनेने उडाली होती खळबळ

Next

वर्धा : गावात एकत्र खेळणारे, बागडणारी चार अल्पवयीन मुले अचानक सायंकाळच्या सुमारास गावातून बेपत्ता झाली. ही घटना सेलू तालुक्यातील मसाळा गावात शनिवारी रात्रीच्या सुमारास उजेडात आली. पोलिसांनी रात्रभर शोध घेऊन तपास चक्र फिरविले असता ती मुले स्वत:हून रेल्वेने गेल्याचे समजले. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी तत्काळ सूचना दिल्याने अवघ्या २४ तासांत चारही अल्पवयीन मुले उडिसा राज्यातील तितलाघर रेल्वेस्थानकासमोरील बारसिंग रेल्वेस्थानकावर मिळून आली. सध्या ही मुले चाईल्ड लाईनच्या ताब्यात सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

पप्पू देवढे (१३), राज येदानी (१३), राजेंद्र येदाणी(१२), संदीप भुरानी (०८) अशी मिळालेल्या मुलांची नावे आहेत.  शनिवारी सकाळच्या सुमारास मनोज मुंगसाजी देवढे याने त्याचा मुलगा पप्पू देवढे याला शाळेतून घरी आणले आणि तो शेतात कामावर निघून गेला. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मनोज काम आटोपून घरी आला असता, त्याला पप्पू घरी दिसून आला नाही. मनोजने पप्पूचा गावात शोध घेतला असता त्याचे तीन मित्रदेखील बेपत्ता असल्याचे समजले.  घटनेची दखल घेत सेलू पोलिसांनी परिसरात शोध घेतला. पण, कुठेही मुले आढळून आली नाही. त्यामुळे, शहरासह जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना पेव फुटले होते.

पोलिसांच्या विविध पथकांनी रात्रभर मुलांचा शोध घेतला. अखेर चारही मुले वर्धा रेल्वेस्थानवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समजले. पोलिसांनी रेल्वेस्थानक गाठून रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक रामसिंग मीना यांच्याशी संपर्क साधून आरपीएफ ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. दरम्यान, चारही मुले रेल्वेस्थानकावर सुमारे पावनेदोन तास वावरत होती हे समजले आणि ती पूरी सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेत बसल्याचे समजले. पोलिसांनी तपासचक्र फिरवले. अखेर मुले ओडिशा राज्यातील बारसिंगा स्थानकावर मिळून आली. चारही मुले सुरक्षितरित्या मिळून आल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

रात्रभर ‘एसपीं’चा गावात मुक्काम

मसाळा गावातून चार अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक संजय गायकवाड तसेच आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट सेलू नजीकच्या मसाळा गावात भेट दिली. गावातील परिरसरात तसेच जंगल परिसरात रात्रभर शोध मोहीम राबविली. मात्र, मुलांचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता.

जिल्हा सीमा केल्या होत्या सील

अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याचे समजताच पोलिसांकडून जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. इतकेच नव्हे, तर गावा गावांत तसेच प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी देखील केली जात होती.

‘एसपीं’चा पाठपुरावा अन् तत्काळ दखल

चारही मुले वर्धा रेल्वेस्थानकावरून पुरी विकली सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वेगाडीतून गेल्याचे समजताच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी तत्काळ उडिसा राज्यातील पोलीस अधीक्षक अनिलसिंग राजपूत यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार उडिसा राज्यातील बारसिंगा येथील पोलीस निरिक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली. प्रत्येक रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. अखेर बेपत्ता झालेली चारही मुले उडिसा राज्यातील बारसिंगा रेल्वेस्थानकावर सापडली. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आले असून त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

रेल्वेस्थानकावरील 'सीसीटीव्ही'मुळे छडा

रेल्वेस्थानकावरील कॅमेऱ्यांची चाचपणी केली असता सर्व मुले रेल्वेत बसल्याचे दिसले. आरपीएफ निरीक्षक रामसिंग मीना, आरक्षक सागर उईके यांनी तत्काळ दखल घेत सर्व रेल्वेस्थानकांवर अलर्ट जारी केला. अखेर सर्व मुले सुरक्षितरित्या मिळून आली.

मुलांना घेण्यासाठी पोलीस पथक रवाना

अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. अखेर पोलिसांनी तपासचक्र फिरवून संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली. विविध ठिकाणची तपासणी केली. अखेर ती सर्व मुले रात्रीच्या सुमारास उडिसा राज्यातील बारसिंगा रेल्वेस्थानकावर सापडली. उद्या २६ रोजी सोमवारी मुलांना ताब्यात घेण्यासाठी वर्धा पोलिसांची चमू रवाना होणार असल्याची माहिती आहे.

अन् आई-वडिलांना अश्रू अनावर...

सेलू तालुक्यातील मसाळा गावातील चार अल्पवयीन मुले अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या आई-वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली होती. आमच्या मुलांना शोधा साहेब, अशी आर्त हाक पालकांकडून केली जात होती. अखेर पोलिसांनी चारही मुलांचा अवघ्या २४ तासांत शोध घेऊन याबाबतची माहिती मुलांच्या आई-वडिलांना मिळताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी वर्धा पोलिसांचे आभार मानले.

Web Title: Four missing minors from Wardha found in Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.