फरार जावयाला चार महिन्यांनी मुंबईत अटक
By Admin | Published: August 27, 2016 12:28 AM2016-08-27T00:28:30+5:302016-08-27T00:28:30+5:30
मोठ्या साळ्याची चाकूचे वार करून हत्या करणाऱ्या तसेच पत्नी व लहान साळ्याला गंभीररित्या जखमी करणाऱ्या आरोपीला तब्बल सव्वाचार महिन्यानंतर
शहर पोलिसांची कारवाई : रेल्वे पुलाखाली लपविला होता चाकू
वर्धा : मोठ्या साळ्याची चाकूचे वार करून हत्या करणाऱ्या तसेच पत्नी व लहान साळ्याला गंभीररित्या जखमी करणाऱ्या आरोपीला तब्बल सव्वाचार महिन्यानंतर बुधवारी मुंबई येथून ताब्यात घेण्यात शहर पोलिसांना यश आले. राजेश उर्फ राजू चंद्रकांत भगत असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला रात्रीच वर्ध्यात आणून न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली. हत्या करण्याकरिता वापरलेला चाकू त्याने रेल्वे पूलाखाली दडवून ठेवल्याची कबुली दिली असून पोलिसांनीही तो जप्त केला आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली माला राजू भगत व तिचा भाऊ नरेंद्र यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. मुंबईचा रहिवासी राजू भगत याचा वर्धा येथील समतानगर भागात राहणाऱ्या माला मारोतराव कांबळे हिच्याशी विवाह झाला होता. राजू हा शंकाखोर स्वभावाचा असल्यामुळे माला हिला नेहमीच त्रास द्यायचा. त्यामुळे ती मुलीला घेऊन वर्ध्याला निघून आली. त्यानंतर दोन ते तीन वेळा राजू पत्नीला घेण्याकरिता वर्ध्याला आला. पण पत्नीने सोबत येण्यास नकार दिला. १६ एप्रिलला तो पुन्हा वर्ध्यात आला असता पत्नी मालाने सोबत येण्याची तयारी दर्शविली, मात्र आधी बैठक घेण्याची अट घातली. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात राजूने मालाचा मोठा भाऊ देवानंद मारोतराव कांबळे (४०) यांच्या पोटावर चाकूचे वार केले. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
यावेळी त्याने लहान साळा नरेंद्र याच्यावरही चाकूने वार केले. यात तोही गंभीर जखमी झाला. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनेपासून फरार असालेल्या राजूचा शोध सुरू होता. राजू सतत स्थळ बदलवित कधी गुजरात, कधी हैदराबाद, कधी उत्तरप्रदेश तर कधी मुंबई असा तो फिरत होता. वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून पत्नी माला व साळा नरेंद्रशी संपर्क साधून धमकी देत होता. हाच धागा पकडून ठाणेदार शिरतोडे यांनी आरोपीला मुंबई पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मुंबईच्या मानखुदृ भागात अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक चंदू खोंड, जमादार प्रमोद जांभुळकर, श्रीकांत खडसे, सचिन वाटखेडे, धुर्वे यांच्या चमूने केली.(प्रतिनिधी)