चार दुकानांचा आगीत कोळसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 11:36 PM2018-05-09T23:36:12+5:302018-05-09T23:36:12+5:30
येथील बाजार चौकातील दुकानाला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यात चार दुकानांचा कोळसा झाला. यामुळे दुकानदारांचे १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले. दुकानाजवळील तणस पेटविल्याने दुकानाला आग लागल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणी : येथील बाजार चौकातील दुकानाला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यात चार दुकानांचा कोळसा झाला. यामुळे दुकानदारांचे १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले. दुकानाजवळील तणस पेटविल्याने दुकानाला आग लागल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी पानाच्या दुकानालगतचे तणस पेटविले. यात ज्ञानेश्वर तोटे यांचे पानाचे दुकान जळून खाक झाले. या आगीने अन्य तीन दुकानेही कवेत घेतली. यात गणेश पोकळे यांचे भाजीपाल्याचे दुकान, सुरेंद्र अतकरे यांचे कटींगचे सलुन तर रमेश कापसे यांच्या विद्युत उपकरणांच्या दुरूस्ती दुकानाचा कोळसा झाला. शिवाय दुकानाजवळ ठेवून असलेली संदीप ठाकरे यांची दुचाकीही जळाली. रात्री २ वाजताच्या सुमारास आगीच्या ज्वाळा व धूर दिसताच उमेश पोकळे यांनी ग्रामस्थांना जागे करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी आग विझविण्यात आल्याने इतर दुकाने बचावली. जळालेल्या दुकानाचा अद्यापही पंचनामा करण्यात आला नाही. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आग लावल्याचा संशय
सदर दुकानांमध्ये रात्री कुणीही काम करीत नव्हते. चार दुकानात विद्युत पुरवठा नसल्याने शॉट सर्कीट वा स्पार्किंगचा प्रश्न नाही. यामुळे ही आग लावण्यात आली असावी, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. पानाच्या दुकानावर पानाचे पेटारे व तणस ठेवून होते. अज्ञात इसमांनी त्या तणसाला आग लावल्याचे निदर्शनास आले. तणसामुळे इतर दुकानेही जळालीत.