बँकॉकमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील चार विद्यार्थी स्वगृही परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 04:51 PM2020-06-08T16:51:04+5:302020-06-08T16:53:05+5:30
शासनाने ‘वंदे भारत मोहिमेत’ थायलंडचा समावेश करून तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांना स्वगृही पोहोचविले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागपूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणारे विविध राज्यांतील १३ विद्यार्थी थायलंडमध्ये प्रशिक्षणाकरिता गेले असता लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. दरम्यान, शासनाने परदेशातील विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता ‘फ्लाईट प्लॅन’ तयार केला होता. पण, यात थायलंडचा समावेश नसल्याने याबाबत ‘विदेशातून परतीच्या फ्लाईट प्लॅनमधून थायलंड बाद’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. अखेर शासनाने ‘वंदे भारत मोहिमेत’ थायलंडचा समावेश करून तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांना स्वगृही पोहोचविले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले आहे.
महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, केरळ व दिल्ली या राज्यातील १३ विद्यार्थी जानेवारी महिन्यात थायलंडला प्रशिक्षणाकरिता गेले होते. मात्र, कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे या सर्व विद्यार्थ्यांनी भारतात परतण्यासाठी १६ एप्रिलला तिकीट काढले होते. त्यानंतर ते बँकॉकच्या विमानतळावर आल्यावर त्यांना भारतातही लॉकडाऊन असल्याने विमानसेवा बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची चांगलीच आबाळ झाली. विद्यार्थ्यांनी लगेच आपल्या नातेवाईकांसह लोकप्रतिनिधी व शासनाची संपर्क साधला. यातच त्यांना एक रात्र विमानतळावर काढावी लागली. त्यानंतर या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांचा समोवश असून त्या चारही विद्यार्थ्यांना बँकॉकमधील महाराष्ट्र मंडळामध्ये आधार देण्यात आला. तब्बल दोन महिने महाराष्ट्र मंडळात काढल्यानंतर ५ जून रोजी महाराष्ट्रातील चारही विद्यार्थी विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले व तेथून आपापल्या गावी पोहोचले. यामध्ये वर्ध्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.
दोन महिने घरच्यासारखा केला सांभाळ
बँकॉकमध्ये अडकून पडल्यानंतर एक रात्र विमानतळावर काढावी लागली. त्यानंतर बँकॉकमधील महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष अर्पिता कुलकर्णी यांच्यासह मंदार पारसनीस व सुदेशकुमार यांनी भारतीय दूतावासाकडून महाराष्ट्रातील ऋषिकेश भरत बच्छाव रा. सोयगाव ता. मालेगाव, संदीप भिकनसिंग निकुंभ रा. रायतेल ता. साक्री दीपक रमेश अहिरे रा. हाताने ता. मालेगाव व कुणाल संजय मानकर रा. वर्धा या चारही विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली. दोन महिने विद्यार्थ्यांची जेवण व राहण्याची व्यवस्था केली तसेच शेवटच्या दिवसापर्यंत सर्व मदतही केली. महाराष्ट्र मंडळाने अडचणीत मदत करून घरच्यासारखी वागणूक दिली, असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
लॉकडाऊनमुळे भारतात येण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे एक रात्र बँकॉकच्या विमानतळावर काढावी लागली. त्यानंतर आम्ही इतरत्र संपर्क साधल्यानंतर तेथील महाराष्ट्र मंडळाने मोठा आधार दिला. तसेच लोकमतनेही आमची अडचण वृत्तांच्या माध्यमातून मांडून लक्ष वेधले. त्यामुळे आम्ही आता सुखरूप आमच्या घरी पोहोचलो. ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केले त्या सर्वांचे आभार.
- कुणाल मानकर, विद्यार्थी, वर्धा.