नोंदणीकृत बचत गटांना मिळणार चार हजाराचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:33 PM2019-09-02T12:33:59+5:302019-09-02T12:34:24+5:30
माविम व उमेद अंतर्गत स्थापन केलेल्या बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात दारुबंदी व व्यसनमुक्ती कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, याकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नोंदणीकृत बचत गटांना ४ हजार रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व उमेद अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नोंदणीकृत बचत गटांना व्यसनमुक्ती व दारुबंदी कार्यक्रमाकरिता प्रत्येकी ४ हजार रुपये अनुदान मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील नोंदणीकृत बचत गटांना याचा फायदा होणार असल्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितले.
माविम व उमेद अंतर्गत स्थापन केलेल्या बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात दारुबंदी व व्यसनमुक्ती कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, याकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नोंदणीकृत बचत गटांना ४ हजार रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ३१ आॅगस्टला आदेशही काढण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमाचे सनियंत्रण पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती करणार असल्याचेही आदेशात नमुद केले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असल्याने या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील माविम व उमेद अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या महिला बचत गटांना या निर्णयाचा लाभ मिळण्याकरिता जिल्हा प्रशासनाने या शासन निर्णयानुसार तत्काळ कार्यवाही करावी, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले आहे.