अतिवृष्टीमुळे चार हजार कोंबड्यांचा बळी; कुक्कुट पालकास दहा लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 02:45 PM2022-07-07T14:45:55+5:302022-07-07T14:48:25+5:30
सोमवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे पोल्ट्री फार्ममधील तब्बल चार हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला.
देऊरवाडा (आर्वी) : आर्वी-पुलगाव मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ खुबगाव मोज्यातील आसलकर यांच्या पोल्ट्री फार्ममधील तब्बल चार हजार कोंबड्यांचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला. यामुळे शेतीला कुक्कुटपालनाची जोड देणाऱ्या शेतकऱ्याचे दहा लाखांचे नुकसान झाले आहे.
खुबगाव त. सा. क्र. १४ / स. क्र. ३३ येथे ०.०२ हेक्टर आरमध्ये मंदा प्रभाकर आसोलकर, रा. खुबगाव यांची शेती आहे. याच शेतात गजानन आसोलकर व हेमंत आसोलकर यांचे पोल्ट्री फार्म असून या पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे पाच हजार कोंबड्या होत्या; पण सोमवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे पोल्ट्री फार्ममधील तब्बल चार हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला.
माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास शासकीय मदतीची अपेक्षा आहे. तशी मागणीही नुकसानग्रस्ताने केली आहे.