अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 09:32 PM2019-05-09T21:32:33+5:302019-05-09T21:34:52+5:30
शहरात विना रॉयल्टी अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना चार ट्रक जप्त केले आहे. ही चारही वाहने जुन्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उभी असून प्रत्येक वाहन मालकाला जवळपास दीड लाख रुपयाचा दंड ठोठावणार असल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात विना रॉयल्टी अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना चार ट्रक जप्त केले आहे. ही चारही वाहने जुन्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उभी असून प्रत्येक वाहन मालकाला जवळपास दीड लाख रुपयाचा दंड ठोठावणार असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई जिल्हा पथकाने केली असून वाळू माफीयांचे धाबे दणाणले आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर वाळू घाटावरुन उपसा बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतरही वाळू उपसा सुरुच असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.इम्रान शेख यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर खनिकर्म अधिकारी शेख व कर्मचारी अनंता राऊत यांनी दुचाकीने महिलाश्रम चौक गाठत तीन ट्रक ताब्यात घेतले तसेच बरबडी या मार्गावरुन एक ट्रक ताब्यात घेऊन चारही ट्रक जप्त केले आहे. यामध्ये राजू तायवाडे रा.गणेशनगर यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक एम.एच.३१ सीबी २५०८, धिरज नारसे रा.गणेशनगर यांच्या मालकीचा एम.एच.४० वाय ३१५१ व टिष्ट्वंकल पठाण रा. वर्धा यांच्या मालकीचा एम.एच.४० एन.०१५० यासह आणखी एक ट्रक जप्त केला असून त्याची नोद बाकी आहे. हे चारही ट्रक तहसीलदारांकडे सोपविले असून जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत उभे आहे. या ट्रक मालकांवर वाहनाचे प्रत्येकी १ लाख रुपये आणि ट्रकमधील रेतीसाठा असे मिळून जवळपास प्रत्येकी दीड ते पावणे दोन लाख रुपये दंड ठोठावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.