वर्ध्यातील सावंगी मेघे रुग्णालयात अवयवदानाची चौथी यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:36 AM2018-06-08T11:36:57+5:302018-06-08T11:37:07+5:30
मध्यभारतात अवयवदान शस्त्रक्रियांची मुहूर्तमेढ करणाऱ्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात चौथ्यांदा अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मध्यभारतात अवयवदान शस्त्रक्रियांची मुहूर्तमेढ करणाऱ्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात चौथ्यांदा अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे. यावेळी, नागपूरच्या रुग्णालयासोबतच सावंगी मेघे रुग्णालयातही अवयव प्रत्यारोपण करण्यात आले.
आर्वी तालुक्यातील धनोडी बहाद्दरपूर येथील रहिवासी सुनील शंकरराव शेराम या ३३ वर्षीय विवाहित तरूणाचा रविवार दि. ३ जून रोजी अपघात झाला. त्याच्या मेंदूला जबर मार बसला. बेशुद्धावस्थेतच त्याला सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. सुनीलवर उपचार करणारे न्यूरोसर्जन डॉ. संदीप इरटवार, डॉ. हेमंत देशपांडे व डॉ. अमोल सिंघम यांनी तपासणी केली असता त्याचा मेंदू मृतावस्थेत असल्याचे आढळले. कोणत्याही परिस्थितीत सुनीलचे प्राण वाचण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. तसेच अवयवदानाची माहिती त्यांना दिली. कुटुंबीयांकडून अवयवदानासाठी लेखी स्वीकृती मिळाल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर व समन्वयक डॉ. रूपाली नाईक यांनी विभागीय प्रत्यारोपण समितीशी संपर्क साधून अवयवदानासाठी आवश्यक शस्त्रक्रिया सावंगी रुग्णालयात पार पाडली. त्यानंतर अवयव सुरक्षितरित्या स्थानांतरीत करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करुन सुनीलचे यकृत (लिव्हर) नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयाकडे सोपविण्यात आले तर एक मुत्रपिंड (किडनी) आॅरेंज सिटी रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आली. याशिवाय, एक किडनी व दोन डोळ्यांचे प्रत्यारोपण सावंगी मेघे रुग्णालयाच करण्यात आले. या प्रक्रियेत शल्यचिकित्सक डॉ. एस.जे. आचार्य, डॉ. एस. देशमुख, डॉ. अभिजित ढाले, डॉ. संजय कोलते, डॉ. मनीष बनवानी, डॉ. इरटवार, डॉ. अमोल बावणे, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. सचिन डायगव्हाणे यांचा सहभाग होता.
ग्रीन कॉरिडॉरसाठी संस्थेचे विश्वस्त सागर मेघे, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी, विभागीय प्रत्यारोपण समितीच्या वीणा वाथोरे यांनी विशेष यंत्रणा उपलब्ध करून दिली. तर, वाहतूक निरीक्षक दत्तात्रय गुरव, सावंगी पोलीस ठाण्याच पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, डॉ. महाकाळकर, गणेश खारोडे, प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, रुपाली नाईक, अहमिंद्र जैन, आदित्य भार्गव, परिचारिका निलम खोंडे, सुरक्षा अधिकारी खैरे व चमूचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.