कारंजात पाण्याअभावी संत्राबागा कोमेजल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:06 PM2019-04-02T22:06:51+5:302019-04-02T22:07:14+5:30
कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. या बागांवर तालुक्याचे आर्थिक गणितही जुळले आहे; पण दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने व विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठल्याने संत्र्याच्या बागा कशा वाचवायच्या, असा प्रश्न बागायतदार शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलगाव (लवणे) : कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. या बागांवर तालुक्याचे आर्थिक गणितही जुळले आहे; पण दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने व विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठल्याने संत्र्याच्या बागा कशा वाचवायच्या, असा प्रश्न बागायतदार शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पाण्याअभावी या परिसरातील अनेक संत्राची झाडे अखेरची घटका मोजत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतातील विहिरींची पाणी पातळी घटली आहे. इतकेच नव्हे तर कुपनलिकाही कोरड्या झाल्या आहेत. अशात पाण्या अभावी संत्र्याचे डेरेदार झाड कोमेजत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील दोन वर्षांपासून अल्पपावसाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. त्यातच उत्पादनात घट येईल, अशी भीती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बोअरवेल व विहिरी तयार करून भू-गर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आल्याने यंदा मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच अनेक विहिरी कोरड्या झाल्या आहेत. शिवाय दिवसेंदिवस तापमानातही झपाट्याने वाढ होत असल्याने याचा विपरीत परिणाम संत्राच्या झाडांवर होत आहे.
काही बागायतदार शेतकरी टँकरने पाणी आणून संत्राच्या बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र बघावयास मिळते. परंतु, ज्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत बागायतदार शेतकऱ्याला टँकरचा खर्च झेपावत नाही अशा शेतकऱ्याने काय करावे, असा सवाल हवालदिल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. संत्रा बागा वाचविण्यासाठी शासनाने बागायतदार शेतकऱ्यांसाठी तातडीने योग्य पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.